कागणी - कालकुंद्री अर्धवट रस्ता कागदावर पूर्ण? चौकशीसाठी १२ एप्रिल रोजी बॅटरी मोर्चा ! नक्की काय आहे हा विषय.......वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2021

कागणी - कालकुंद्री अर्धवट रस्ता कागदावर पूर्ण? चौकशीसाठी १२ एप्रिल रोजी बॅटरी मोर्चा ! नक्की काय आहे हा विषय.......वाचा.....

कागणी- कालकुंद्री रस्त्याची सध्या बीबीएम उखडून झालेली दुर्दशा.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

          कालकुंद्री ते कागणी या ९०० मिटर लांबीच्या रस्त्याचे प्रत्यक्षात केवळ बीबीएम डांबरीकरण झालेले असताना कार्पेट व सीलकोट  पूर्ण? झाल्याचे कागदोपत्री दाखवून ठेकेदारास संपूर्ण बिल आदा केले. असा आरोप करत याच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकामच्या चंदगड कार्यालयावर बॅटरी मोर्चाचे आयोजन  करण्यात आले आहे. 

रस्ता प्रश्नी आंदोलन इशारा फलकाचे कालकुंद्रीत उद्घाटन करताना प्रा. दीपक पाटील, संभाजी पाटील, शंकर मुर्डेकर आदी


       जानेवारी ते मार्च २०१९ मध्ये नवी टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आलेला हा रस्ता नव्या टेक्नॉलॉजीला उघडे पाडत त्याच वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरात वाहून गेला. गतवर्षी या रस्त्याचे पुन्हा खडीकरण, बीबीएम डांबरीकरण, कार्पेट व सिलकोटला मंजुरी मिळाली. याचे खडीकरण व बीबीएम झाले असून रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. तथापि रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून बिले उचलल्याचे समजते. याबाबत कालकुंद्री येथे निषेध फलक लावून १२ एप्रिल रोजी बॅटरी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

          निषेध फलकाचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कालकुंद्री चे उपसरपंच संभाजी पाटील, सदस्य  प्रशांत मुतकेकर, विलास शेटजी, अझरुद्दीन शेख, अशोक पाटील, एस के मुर्डेकर, शंकर कोले, दयानंद जोशी, शरद जोशी आदींची उपस्थिती होती. प्रा. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. फलकावर रस्त्याची लांबी ९०० मिटर, काम सुरू एप्रिल २०१९, मंजूर रक्कम ६० लाख, बीबीएम झाले सील कॉट का राहिले? रस्ता अर्धवट असताना ठेकेदाराचे बिल मंजूर कसे? आदी मुद्यांचा शोध घेण्यासाठी बॅटरी मोर्चा! असा उल्लेख केला आहे. 

        या आंदोलनाच्या  इशाऱ्यामुळे  परिसरात खळबळ उडाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह कालकुंद्री, कागणी व परिसरातील अन्य ग्रामस्थही यात सामील होणार आहेत. 

No comments:

Post a Comment