रस्त्यावर थांबवलेली वाहने देताहेत अपघातांना आमंत्रण, हटविण्याची मागणी, कोठे.......वाचा........ - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2021

रस्त्यावर थांबवलेली वाहने देताहेत अपघातांना आमंत्रण, हटविण्याची मागणी, कोठे.......वाचा........

कागणी- कालकुंद्री मार्गावर थांबवलेल्या वाहनांमुळे अपघात घडत आहेत.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       कागणी- कालकुंद्री रस्त्यालगत कागणी येथे दुतर्फा पार्क केलेली वाहने रहदारीला अडथळा ठरत असून अपघातांना आमंत्रण देत आहेत. ती तात्काळ बाजूला करून रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

      गडहिंग्लज, नेसरी, कोवाड ते बेळगाव मार्गापासून कागणी, कालकुंद्री, कुदनुर, दड्डी मार्गे हत्तरगी येथील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता आहे. रोज शेकडो लहान-मोठी वाहने यावरून ये जा करत असतात तथापी कागणी गावानजीक या रस्त्यालगत ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली व चार चाकी वाहने थांबवलेली असतात. तर घरांसमोर लाकडे, दगड, विटा व शेणाचे ढिगारे नेहमी टाकलेले असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताचे प्रसंग घडत आहेत. दोन दिवसापूर्वी येथील वळणानजीक थांबवलेल्या ट्रॉली मुळे वाळूचा ट्रक व पिंजर भरलेला ट्रॅक्टर यांच्यात धडक झाली. पण मोठा अनर्थ टळला. येथे नेहमी अपघाताचे प्रसंग घडत आहेत. अन्य वाहनांमुळे समोरून मोठे वाहन आल्यास दुचाकीलाही वाट राहत नाही. त्यामुळे संबंधितांनी ही वाहने अन्यत्र हलवावी. यासाठी तसेच इतर गावातूनही अशा प्रकारचे असलेले अडथळे दूर करण्यासाठी बांधकाम विभागाने पावले उचलावीत व संबंधित ग्रामपंचायतींना तशा सूचना द्याव्यात अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

No comments:

Post a Comment