बॅटरी मोर्चाच्या इशाऱ्यानंतर कालकुंद्री- कागणी रस्त्याचे डांबरीकरण सुरू, प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांतून समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2021

बॅटरी मोर्चाच्या इशाऱ्यानंतर कालकुंद्री- कागणी रस्त्याचे डांबरीकरण सुरू, प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांतून समाधान

कालकुंद्री- कागणी रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी करताना सरपंच छाया जोशी, एस के मुर्डेकर आदी


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    बीबीएम नंतर कालकुंद्री- कागणी (ता. चंदगड) रस्त्याचे काम डांबरीकरणाअभावी वर्षभर रखडले होते. बांधकाम विभागाने ते आज दि. १५ पासून सुरू केल्यामुळे ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून याप्रश्‍नी काढण्यात येणारा बॅटरी मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

      कागणी, कालकुंद्री, राजगोळी, दड्डी, हत्तर्गी या चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाच्या रस्त्या पैकी ९०० मीटर लांबीचा हा भाग गतवर्षी खडीकरण, बीबीएम, कार्पेट व सीलकोट असा मंजूर होता. तथापि ठेकेदाराने खडीकरण व बीबीएम केल्यानंतर पुढील काम रखडले होते. कालकुंद्री, कागणी ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'बांधकाम' शी संपर्क साधला असता ठेकेदाराचे बिल अदा होऊन? काम पूर्ण झाल्याचे दिसून आले होते. याप्रश्नी दि. १२ एप्रिल रोजी ‌ बांधकाम विभागाच्या कार्यालयावर 'बॅटरी (टॉर्च) मोर्चा' आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. तथापि आंदोलना पूर्वीच बांधकाम विभागाने ८ रोजी सर्व यंत्रसामुग्री कामाच्या ठिकाणी पाठवली. गेल्या चार दिवसातील अवकाळी पावसामुळे थांबलेले काम आज १५ रोजी सुरू झाले. याकामी प्रा. दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. के. मुर्डेकर, कालकुंद्रीच्या सरपंच सौ. छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, सदस्य व दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी विशेष भूमिका बजावली. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तुषार बुरुड व शाखा अभियंता संजय सासणे यांनी केलेल्या कार्यवाही मुळे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली.

       हा रस्ता अरुंद असल्यामुळे बाजू काढताना वाहने डांबरी रस्त्याच्या खाली घ्यावी लागतात. त्यामुळे रस्ता खराब होण्यापूर्वी साईड पट्ट्यांचे काम हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment