देणगीतून साकारली सहा लाखांची व्यायामशाळा, कोणत्या गावात......वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2021

देणगीतून साकारली सहा लाखांची व्यायामशाळा, कोणत्या गावात......वाचा......

कागणी येथील व्यायामशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात दिप्रजवलन करताना आनंद देसाई. शेजारी विष्णू जोशीलकर, शंकर पुजारी.

चंदगड / प्रतिनिधी

         कागणी (ता. चंदगड) येथे भारतीय सैन्य दलातील निवृत्त झालेले हवालदार व सध्या चंदगड येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले आनंद देसाई यांनी पुढाकार घेत गावातील तरुणांना एकत्र करून लोक देणगीतून सहा लाखांची व्यायामशाळा उभारली आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर व कोल्हापूर येथील निवृत्त पीएसआय कृष्णा देसाई यांच्या हस्ते या व्यायामशाळेचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन झाले. 


         तालमीमध्ये व्यायाम करण्याची परंपरा आता पूर्णपणे नाहीशी होत चालली आहे. पण तरुणांना आता अत्याधुनिक मशीनद्वारे व्यायाम करण्याचे वेड आहे. यामुळे आम्ही सर्व तरुणांनी पुढाकार घेतला. यासाठी गावातील नोकरदार, उद्योजकांनी सढळ हस्ते मदत केली. यातून आम्ही सहा लाखांची व्यायाम शाळा उभारली. सर्वांना मोफत सुविधा दिली जाणार आहे, असे जय हनुमान व्यायाम शाळा कागणीचे उपाध्यक्ष विनोद कुदनूरकर यांनी सांगितले. 


     बेळगावचे उद्योजक दिनेश देसाई, प्रा. डॉ. अशोक बाचूळकर, कोल्हापूरचे उद्योजक जोतिबा बाचुळकर, महादेव जांभळे,वाहतूक पोलीस महादेव मुरकुटे, जया खानापुरे, अण्णा बाचुळकर,  बेळगावचे उद्योजक आनिल भोगण, विष्णू बाचुळकर, केदारी भोसले उपस्थित होते. या व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी कागणी तसेच नेसरी परिसरातील गवंड्यानी श्रमदान केले. इलेक्ट्रिकचे काम मोहन पाटील (कल्याणपूर), पत्रे बसवण्याचे काम जोतिबा देसाई, शिवाजी कांबळे यांनी मोफत रंगकाम केले. मुंबई येथील आमची मुंबई मंडळाने ५५ हजार रुपयांची देणगी तर आजी व माजी सैनिकांकडून एक लाख रुपयांहून अधिक देणगी जमा झाली. ग्रामपंचायत च्या १४व्या वित्त आयोगातून ६० हजार रुपयांची मदत मिळाली. व्यायामशाळेचे अध्यक्ष आनंद देसाई, उपाध्यक्ष विनोद कुदनुरकर, सचिव संदीप तरिहाळकर, कपिल देसाई, कृष्णा सुळेभावकर, शंकर पुजारी, गोवर्धन पुजारी, रणजित देसाई, सूर्याजी भोगण, जयराम कांबळे, सर्जेराव बाचुळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी  परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment