उघडी डीपी आठ वर्षांपासून धोकादायक अवस्थेत, वीज कंपनीचे दूर्लक्ष, मोर्चाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2021

उघडी डीपी आठ वर्षांपासून धोकादायक अवस्थेत, वीज कंपनीचे दूर्लक्ष, मोर्चाचा इशारा

कालकुंद्री कुदनुर रस्त्यावर वीज कंपनीने बसवलेली सताड उघडी धोकादायक डीपी.


 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      कालकुंद्री- कुदनुर मार्गावर वीज वितरण कंपनीच्या वतीने बसवलेली डीपी गेली सात-आठ वर्षे उघडीच आहे. मुख्य रस्त्यावर केवळ दोन फूट उंचीवर असलेली ही डीपी लहान मुले व पाळीव प्राण्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. मोडलेला दरवाजा तात्काळ बसवून डीपी बंदिस्त करावी अशी मागणी होत असून परिसरातील ग्रामस्थांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
         अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारून ती थकल्यास तात्काळ कारवाई करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत अनेक वेळा तोंडी लेखी विनंती सह  वर्तमानपत्रात बातम्या देऊनही याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे. या मार्गावरून कालकुंद्री येथील गाय, म्हैस, रेडके, वासरे आदी पाळीव जनावरे कुदनूर ओढ्याकडे धुण्यासाठी सोडली जातात. मालक मागे राहिलेला असताना बऱ्याच वेळा ही जनावरे या डीपीला आपले अंग घासताना दिसतात. उघड्या फ्यूजला जनावरांचे तोंड, शरीराचा भाग चिकटल्यास किंवा जाता-येता लहान मुलांनी येथे हात लावल्यास गंभीर दुर्घटना घडण्याचा संभव आहे. याबाबत गेल्या सात-आठ वर्षात अनेकदा तोंडी लेखी सांगूनही इतर कामात 'इंटरेस्ट' असणारे अधिकारी व कर्मचारी या बाबतीत मात्र डोळेझाक करत आहेत. याबाबत परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून आठ दिवसात डीपी दरवाजा लावून बंदिस्त न केल्यास कोवाड येथील वीज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कालकुंद्री ग्रामस्थांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment