हॉटेलचे छप्पर फोडून दीड लाखांची दारु लंपास ! कुठे घडली आहे घटना? - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

हॉटेलचे छप्पर फोडून दीड लाखांची दारु लंपास ! कुठे घडली आहे घटना?कागणी : सी. एल. वृत्तसेवा

शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे महामार्गाला लागून असणाऱ्या डीलक्स हॉटेलचे पत्र्याचे छप्पर फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी 20 दारूचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. यात १ लाख, ५० हजार रुपयांचा फटका बसला आहे. सदर चोरट्यांचा तातडीने चंदगड पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी हॉटेल व्यवसायिकातून होत आहे. मूळचे देवरवाडी (ता. चंदगड) व सध्या विजयनगर, बेळगाव येथील रहिवासी केदारी विष्णू भोसले यांचे शिनोळी येथे हॉटेल डीलक्स आहे. त्यांनी याबाबत चंदगड पोलिसात वर्दी दिली. यानंतर घटनास्थळी पाटणे फाटा पोलीसचौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोवार, आनंद देसाई यांनी सदर हॉटेलची पाहणी करुन माहिती घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शनिवार व रविवार दोन दिवस लॉकडाऊन होते. यामुळे सदर हॉटेलमधील सर्व कामगार गावी गेले होते. ही संधी साधून रविवारी मध्यरात्री हॉटेलच्या पाठीमागून कंपाऊंडवरून प्रवेश केला. यानंतर हॉटेलवर पत्र्याचे छप्पर फोडून चोरटे थेट आतमध्ये गेले. यानंतर ३२ हजार रुपये किमतीचे दोन बॉक्स व अन्य १८ बॉक्स असे सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचे २० बॉक्स लंपास केले. या घटनेने परिसरातील महामार्गावरील हॉटेल चालकात भीती निर्माण झाली असून पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायीकातून होत आहे.No comments:

Post a Comment