गोकुळसाठी सत्ताधरी गटातून विद्यमान संचालक दिपक पाटील व विरोधी पॅनेल आमदार राजेश पाटील फिक्स, उर्वरित दोन उमेदवाराना लागणार लाॅटरी, कोण-कोण आहे रिंगणात, वाचा सविस्तर........ - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2021

गोकुळसाठी सत्ताधरी गटातून विद्यमान संचालक दिपक पाटील व विरोधी पॅनेल आमदार राजेश पाटील फिक्स, उर्वरित दोन उमेदवाराना लागणार लाॅटरी, कोण-कोण आहे रिंगणात, वाचा सविस्तर........

नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी

         गोकुळच्या निवडणुकीसाठी १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. चंदगड  तालुक्यातून तब्बल १६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सत्तारूढ गटातून विद्यमान संचालक दीपक पाटील व   विरोधी पॅनेलमधून विद्यमान संचालक आम.राजेश पाटील यांची उमेदवारी फिक्स असून उर्वरित दोन्ही गटातील एक-एक जागेसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी  फिल्डिंग लावली आहे. पण गोकुळच्या संचालक पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र अर्ज माघारी नंतरच ठरणार आहे. 

राजेश पाटील     दिपक पाटील  विक्रमसिंह पाटील   विशाल पाटील

        चंदगड तालुक्यात सध्या दोन संचालक असून त्यापैकी एक आमदार राजेश पाटील तर दुसरे दीपक पाटील आहेत. हे दोन्ही संचालक गेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटातून विजयी झाले होते. सध्या राजकीय समिकरणं बदलली आहेत. माजी राज्यमंत्री भरमू पाटील भाजपमध्ये तर आमदार राजेश पाटील राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते स्व. सुरेशराव चव्हाण - पाटील यांना गेल्या निवडणुकीच्यावेळी पुढच्यावेळी संधी देण्याचे आश्वासन मंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. त्यामुळे स्व. सुरेशराव चव्हाण पाटील यांचे सुपुत्र विक्रमसिंह चव्हाण - पाटील यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. नुकताच काँग्रेस प्रवेश केलेल्या गोपाळराव पाटील यांनाही आपल्याला गोकुळचे संचालक पद हवे असलेने आपला मुलगा विशाल याचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऐनवेळी महिला जागा वाटणीला आल्यास तयारीत रहावे म्हणून माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी आपल्या स्नुषा ज्योती पाटील यांच्या नावाचा ठराव बसर्गेच्या महिला दूधसंस्थेतून करून घेतला आहे. तर आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुस्मिता पाटील यांचा ठराव लकीकट्टेच्या दूध संस्थेतून करण्यात आला आहे. गोपाळराव पाटील यांनी आपला मुलगा विशाल पाटील यांच्या नावे तांबुळवाडी दूध संस्थेतून ठराव करून घेतला आहे. काँग्रेसचे विक्रमसिंह चव्हाण पाटील यांचा निटूरच्या दूध संस्थेतून ठराव झाला आहे. थोडक्यात सर्वांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

       चंदगड तालुक्यातून गोकुळ'वर मारूती कांबळे, महादेव कांबळे, नामदेव कांबळे यांच्या सह विद्यमान संचालक आम राजेश पाटील, दिपक पाटील यांनी नेतृत्व केले. गोकुळ स्थापनेपासून वीस वर्षे चंदगडला सत्ताधारी मंडळीनी संचालक पदाविना दुर्लक्षित ठेवले होते. मारूती कांबळे यांच्या रूपाने गोकुळमध्ये चंदगडच्या नेतृत्त्वाला सुरवात झाली. सत्तारुढ गटात फूट पडली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ पॅनेल रिंगणात येणार असून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आदींच्या नेतृत्वाखाली विरोधी राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलची रचना केली आहे. या दोन पॅनेलमध्ये यावेळी संघर्ष अनुभवास येणार आहे. तालुक्यातून सत्तारुढयातील बऱ्याच उमेदवारांनी खुल्या जागेबरोबरच विविध राखीव जागेवर ही उमेदवारी अर्ज भरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नेतेमंडळीना कोणत्याही गटातून उमेदवारी द्यावयाची झाल्यास अडचण येऊ नये यासाठी इच्छुकांनीच अनेक पर्याय ठेवत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गणिते आणि शक्यता काहीही असलीतरी पॅनेल रचनेत कुणाकडूनही कोणाही उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक इच्छुक नेत्यापर्यंत पोहचण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. सत्तारुढ किंवा विरोधी पॅनेलमधून इच्छुकांना उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरीची ही लागण चंदगड तालुक्यासह जिल्ह्यात पहायला मिळणार आहे.  

           चंदगड तालुक्यातून १६ उमेदवारी अर्ज दाखल चंदगड 

       गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यातून १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटातून चंदगड तालुक्यासाठी किमान दोन- दोन संचालकपदे दिली जाणार असल्यामुळे नेमके कुणाला संधी मिळते, यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चंदगड तालुक्यातून विद्यमान संचालक आमदार राजेश नरसिंगराव पाटील (म्हाळेवाडी), दीपक भरमू पाटील (बसरगे) यांच्यासह विक्रमसिंह सुरेशराव चव्हाण - पाटील (निटूर), विशाल गोपाळराव पाटील (शिवणगे), रविंद्र नामदेव बांदिवडेकर (नागनवाडी), अशोक धाकलू कदम (कलिवडे), मारुती गणू कांबळे (किटवाड), शामराव गोपाळराव बेनके (माणगाव), मोनाली मोहन परब (सातवणे), सुस्मिता राजेश पाटील (शिवणगे), मोहन संतू परब (सातवणे), वसंत गणपती निकम (विंझणे), भरमाणा मष्णू गावडे (हलकर्णी) , अशोक पांडुरंग जाधव (मलगेवाडी), मारुती जोतीबा पाटील (कालकुंद्री) आणि महंमदझाकीर नजीरअहमद काझी (तळगुळी) यांनी अमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावेळी तरी सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणार का? आजपर्यंत वारसच सरस 

        आजपर्यंत राजकारणात नेत्यांच्या वारसालाच महत्त्वाची पदे मिळाल्याचा इतिहास आहे. गटासाठी किंवा नेत्यांचा 'शब्द' प्रमाण मानून आयुष्य खर्ची घालणारा कार्यकर्ता मात्र लाभाच्या पदांपासून वंचित राहतो. त्यामुळे 'गोकुळमध्ये नेत्यांच्या वारसाबरोबरच सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला यावेळी संचालकपद मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

          राजकीय नेत्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता कधीतरी सर्वसामान्य गोरगरिब कार्यकर्त्यांचाही विचार करावा. सगळी पद तुमच्याच घरात... कार्यकर्त्यांनी केवळ तुमची पाठराखणच करायची का?... सत्तेच विकेंद्रीकरण केल्याशिवाय नेता मोठा होत नाही. हा इतिहास असून त्याचे चिंतन चंदगडच्या नेत्यांनी करण्याची गरज गोकुळच्या निमित्ताने चर्चीली जात आहे. 

                      चंदगड ला तीन संचालकपदे मिळावीत

        चंदगड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांसह गटातटाच्या नेत्यांना संचालक पदाचे मधुर स्वप्न पडत आहे. कोल्हापूर जिल्हयात सर्वाधिक ९ ० हजार लिटर दुधाचा पुरवठा करणारा तालुका म्हणून चंदगडचा लौकिक आहे. शिवाय या दुधातील ६० टक्के दूध म्हशीचे आणि ४० टक्के दूध गाईचे असल्याने सर्वाधिक फॅट देणारा तालुका म्हणूनही चंदगडची वेगळी ओळख आहे. दुधाचा आणि संस्थांचा विचार करता चंदगड तालुक्याला किमान तीन संचालकपदे मिळण्याची गरज आहे.

                चंदगड ला "अध्यक्षपदाचा"मान मिळणार का?

           गोकुळ ची निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. एक-एक मताला महत्व निर्माण झाले आहे. गोकुळ स्थापनेपासून आजपर्यंत कधीही चंदगड तालुक्याला गोकुळचे अध्यक्ष पद मिळालेले नाही. त्यामुळे हिच संधी आहे. काही घडामोडी घडत असतांना अध्यक्ष पदाची अट घालूनच कोणत्याही आघाडीला मताचे पाठबळ द्यावे, अशीही चर्चा मतदारातून ऐकायला मिळत आहे. 



No comments:

Post a Comment