'आधार' साठी कोवाड परिसरातील नागरिकांची ससेहोलपट - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2021

'आधार' साठी कोवाड परिसरातील नागरिकांची ससेहोलपट

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात माणगाव ते राजगोळी, कामेवाडी पर्यंत ३० किलोमीटर  पट्ट्यात एकही आधार केंद्र नाही. कोवाड कुदनुर येथे असलेली आधार केंद्रे गेल्या चार महिन्यापासून बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांना गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी किंवा बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील शिनोळी येथे जावे लागत आहे. २५-३० किमी चा हेलपाटा, आर्थिक भुर्दंड व शारीरिक टमानसिक त्रासाला वैतागलेल्या नागरिकांनी कोवाड परिसरातील आधार केंद्र सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

      सध्या बाल विकास प्रकल्प अंतर्गत लहान बालकांना मिळणारा पोषण आहार आधार कार्ड शिवाय मिळत नाही. याशिवाय अन्य कारणासाठी ही बालकांचे आधार कार्ड गरजेचे आहे. ते काढणे पालकांसाठी एक दिव्यच ठरत आहे. वयोवृद्ध नागरिकांची अवस्था यापेक्षाही वाईट आहे. अनेक आधार केंद्र बंद केल्यामुळे चालू असलेल्या केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत नंबर लागेल याची खात्री नाही. बऱ्याच वेळा नंबर येण्यास दोन-दोन दिवस लागत आहेत. तळपते ऊन आणि प्रचंड उकाड्यामुळे अंगाची लाही होत असताना लहान बालकांना इतका वेळ सांभाळणे अवघड झाले आहे.

     लहान बालके, वयोवृद्ध नागरिक, शेतकरी, महिला आदींची आधार केंद्राअभावी होणारी कुचंबना थांबवण्यासाठी बंद केलेली आधार केंद्रे तात्काळ सुरू करावीत अशी मागणी होत आहे.




No comments:

Post a Comment