ताम्रपर्णी नदीचे पाणी काळवंडले, सार्वजनिक आरोग्य धोक्यात, कारणे शोधण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2021

ताम्रपर्णी नदीचे पाणी काळवंडले, सार्वजनिक आरोग्य धोक्यात, कारणे शोधण्याची मागणी

कोवाड नजीक ताम्रपर्णी नदीतून वाहणारे काळेकुट्ट पाणी.

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

          गेल्या चार दिवसांपूर्वी स्वच्छ असलेले ताम्रपर्णी नदी चे पाणी अचानक काळे ठिक्कर पडले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने पाणी अचानक काळे होण्यामागच्या कारणांचा शोध घेऊन तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी पर्यावरणप्रेमी, नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.

ताम्रपर्णी नदीचे काळे पडलेले पाणी.

        गेल्या चार-पाच दिवसापूर्वी स्वच्छ असलेले पाणी काळे कुट्ट पडले आहे. हे पाणी पाइपलाइनद्वारे शेतीला पुरवठा करताना दुर्गंधीयुक्त तीव्र वास येत असून शेतकऱ्यांच्या अंगाला खाज पडत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना त्वचा रोग उद्भवले आहेत. नदीकाठावरील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल नदीपात्रालगत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोना काळात ही ज्यादाची आपत्ती नागरिकांना भेडसावत आहे. या पाण्याचा गाय, म्हैस आदी पाळीव प्राण्यांना त्रास सुरू झाल्यामुळे नागरिकांनी त्यांना नदीकडे नेणे बंद केले आहे. याचा नदीतील जलचरांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. एकंदरीत परिसरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी नैसर्गिकरीत्या काळवंडले आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत? याचा संबंधित विभागाने तात्काळ शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच नदीचे पाणी पूर्ववत स्वच्छ होण्यासाठी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment