![]() |
बसाप्पा बिराप्पा हारुगेरी |
कालकुंद्री : सीीीीीी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) शिवारात गव्याच्या हल्ल्यात धनगर गंभीर जखमी झाला. बसाप्पा बिराप्पा हारुगेरी, वय ३० रा. सलामवाडी, ता. हुकेरी, जि. बेळगाव असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवार दि १७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची हकीकत अशी, सलाम वाडी येथील धनगर बिराप्पा हारुगेरी हे आपल्या कुटुंबासमवेत मेंढ्यांचा कळप घेऊन कालकुंद्री परिसरात गेल्या महिनाभरापासून फिरत आहेत. दोन दिवसांपासून कालकुंद्री गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सय्यद तलाव नजीक बाबू कामाना पाटील यांच्या शेतात बकरी बसवली होती. आज दुपारी जखमी बसाप्पा हा आपले नातेवाईक सिद्धाप्पा कासेवगोळ व हालाप्पा कासेवगोळ यांना सोबत घेऊन कळपाला पाणी पाजण्यासाठी किटवाड धरण जलाशयाकडे वजर शेत परिसरात गेला होता. यावेळी अचानक होसूर ओढ्याच्या दिशेने गवा येत असल्याचे पाहून मेंढ्यांसह सर्वजण बिथरले. गव्याने मेंढ्यांवर हल्ला करू नये यासाठी धिटाईने बसाप्पा गव्याला हाकलण्यासाठी गेला असता गव्याने त्याला छातीवर धडक देऊन गंभीर जखमी केले. इतरांच्या आरडाओरड्याने गवा बाजूला गेला. परिसरातील शेतकऱ्यांनी जखमीस कालकुंद्रीत खाजगी डॉक्टरकडे प्रथमोपचार करून तात्काळ दड्डी येथील आरोग्य केंद्र व नंतर हत्तरगी येथील हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. या घटनेमुळे धनगर बांधवांसह शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सहसा गवे कळपाने फिरत असले तरी हा गवा एकटाच होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या तो याच परिसरात फिरताना अनेक शेतकऱ्यांना दिसला. ग्रामस्थांनी या परिसरात जाऊ नये असे आवाहन कालकुंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. चंदगड वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन उपाय योजना करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment