धनगरावर हल्ला केलेल्या गव्याचा कौलगे नजीक उष्माघाताने मृत्यू, वाचा कधी घडली ही घटना....... - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2021

धनगरावर हल्ला केलेल्या गव्याचा कौलगे नजीक उष्माघाताने मृत्यू, वाचा कधी घडली ही घटना.......

कौलगे नजीक वन तळ्यातील गाळात अडकलेला गवा.

कालकुंद्री : (विशाल पाटील) सी. एल. वृत्तसेवा 


       कालकुंद्री (ता. चंदगड) शिवारात काल दि. १८ रोजी गव्याने धनगरास मारून गंभीर जखमी केले होते. या गव्याचा आज दुपारी उष्माघाताने कौलगे ता. चंदगड गावानजीक वनविभागाच्या अखत्यारीतील तळ्याजवळ मृत्यू झाला.
जखमी धनगर बसाप्पा बिराप्पा हारुगेरी.

      कालकुंद्री गावच्या हद्दीत किटवाड जलाशयात मेंढ्यांच्या कळपास पाणी पाजण्यासाठी नेत असताना वझर नावाच्या शेतात गव्याने मेंढपाळावर हल्ला केला होता. यात सलामवाडी ता. हुकेरी जि. बेळगाव येथील बसाप्पा बिराप्पा हारुगेरी हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर यमकनमर्डी ता. हुक्केरी (कर्नाटक) येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याच गव्याने काल सायंकाळी कुदनूर येथील आनंदी बंबर्गेकर, यल्लुबाई बंबर्गेकर, माधूरी खामकर या तीन महिलांना धडक मारून जखमी केले होते.
       पाटणे क्षेत्राचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील हे जखमीची विचारपूस करण्यासाठी यमकनमर्डी व कुदनूर येथे गेले असता दुपारी दोन वाजता गव्याच्या मृत्यूची बातमी समजली. ते तात्काळ वनपाल जी एम होगाडे, वनरक्षक दीपक कदम, वनमजूर लहू पाटील व वैद्यकीय अधिकारी शिवगण आदींचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पुर्ण वाढ झालेला चार ते पाच वर्षाचा हा नर गवा कळपापासून दूर गेल्याने सैरभैर झाला होता. धावपळीत उष्म्याने हैराण झालेला गवा त्याचा मूळ रहिवास असलेल्या वैजनाथ डोंगर रांगांकडे जाताना मार्गावरील कौलगे नजिक तळ्यात पाणी पिण्यासाठी उतरला असावा.  दुर्दैवाने चार दिवसात झालेल्या पावसामुळे झालेल्या गाळात अडकुन धडपडीत त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी येथील तरुणांनी त्याला बाहेर काढण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. शेवटी पंचनामा व शवविच्छेदनानंतर गव्याला दफन करण्यात आले. याप्रसंगी कौलगेचे पोलीस पाटील सटुपा लक्ष्मण मेणसे यांचेसह मारुती रामचंद्र बिर्जे, सुनील शिवाजी पाटील आदींचे सहकार्य लाभले.
        दरम्यान गव्याच्या हल्ल्यात जखमी धनगर बसाप्पा हारुगेरी व महिलांना वन विभागामार्फत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले.

1 comment:

Unknown said...

Chukichi mahiti pasrau naka
Koulage gavchya dongratla ha prani ahe 360 ekar dongar jamin deun,shetiche bharpur nuksan sahan karun sudha koulage gavala janunbujun vaglal jatay sarkarn yachi dakhal gyavi
Varil ghatnecha v ya gavyacha kahihi samband nahi ase bharpur prani jivant dongrat pahayla miltil jyana pahayche astil tyani koulage donrat jave

Post a Comment