प्रांताधिकारी, कोवाड सरपंचासह स्थानिक कमिटीच्या मध्यस्तीने कोवाड आशा वर्करांचे काम बंद आंदोलन मागे - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2021

प्रांताधिकारी, कोवाड सरपंचासह स्थानिक कमिटीच्या मध्यस्तीने कोवाड आशा वर्करांचे काम बंद आंदोलन मागे

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          मागील आठवड्यात कोवाड (ता. चंदगड) येथे कोरोना बाबत सर्व्हे करताना होम आयसोलेट असलेल्या व्यक्तींच्या घरच्यांकडून आशा वर्करांवर अरेरावीचा प्रकार घडला होता. त्यामुळे सर्व गटप्रवर्तक व आशा वर्कर कडून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यांनतर प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, कोवाडच्या सरपंच सौ. अनिता भोगण व स्थानिक कमिटी यांनी मध्यस्थी केल्याने आशा वर्करांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे आज प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. 

         यासंदर्भात प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर बोलताना म्हणाल्या कि, ``गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा वर्कर, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार अहोरात्र काम करत आहेत. सद्यस्थितीत एकीकडे कोरोना लसीकरण जरी चालू असले तरी कोरोना रुग्णाची संख्या पण वाढताना दिसत आहे. अशावेळी आरोग्य विभागासह आशा वर्कर गेल्या वर्ष भरापासून आपले काम अविरत चालू ठेवले असून नागरिकांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. यापुढे असे प्रकार झाल्यास प्रशासनाकडून त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी यांनी दिला आहे.

       कोवाडच्या सरपंच सौ. अनिता भोगण म्हणाल्या कि, ``कोरोनाच्या संकट समयी स्थानिक पातळीवर आशांचा संपर्क हा प्रत्येक घरोघरी येतो. आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्कर यांच्यासह अंगणवाडी सेविका यांच्याशी सर्व गावातील नागरिकांनी सौजन्यतेने वागावे. असे आवाहन करण्याबरोबरच स्थानिक समिती आशा वर्करांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल असे आश्वासन दिले.

        या आश्वासनानंतर गेल्या चार दिवसापासून पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेत प्रत्यक्ष बुधवार दि. १४ एप्रिलपासून आशांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आशांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल या आशा वर्करनी प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर, सरपंच अनिता भोगण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, तहसीलदार विनोद रणावरे व स्थानिक समितीचे आभार व्यक्त केले.



No comments:

Post a Comment