चंदगड मध्ये १८६६ बालकांनी घेतला पहिलीत प्रवेश, 'गुढीपाडवा पट वाढवा' उपक्रम उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2021

चंदगड मध्ये १८६६ बालकांनी घेतला पहिलीत प्रवेश, 'गुढीपाडवा पट वाढवा' उपक्रम उत्साहात

शिप्पूर शाळेत बालक व पालक यांचे स्वागत करताना मुख्याध्यापक व शिक्षक.


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 'गुढीपाडवा पट वाढवा' अभियान अंतर्गत चंदगड तालुक्यातील २०० शाळांतून १८६६ मुला-मुलींनी प्रवेश घेतला. तालुक्याने ७५ टक्के पेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले. तालुक्यातील १९ केंद्रांपैकी उमगाव केंद्राने शंभर टक्के उद्दिष्ट पार केले. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार यांनी दिली.

कोवाड केंद्र शाळेत पालकांकडून प्रवेश अर्ज स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील व शिक्षक.

       जिल्हा परिषद शाळांतील पट वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुलांना शाळा प्रवेश देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत चंदगड तालुक्यात प्रवेश प्रक्रिया कोरोना पार्श्वभूमीवरही उत्साहाने राबविण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांनी गावोगावी राबविलेल्या पटनोंदणी अभियान अंतर्गत ३१ डिसेंबर २०२१ रोजी सहा वर्षे पूर्ण  करणारी १२३९ मुलगे व १२४० मुली अशी २४७९ बालके आढळली होती. त्यांपैकी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ९१३ मुलगे व ९५३ मुली अशा १८६६ बालकांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला. यात तालुक्याने ७५ टक्के पेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले. कोरोना नियमावलीचे पालन करत तालुक्यातील अनेक शाळांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.

        उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. सुभेदार यांच्यासह विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे, बी आर सी विषय तज्ञ महादेव नाईक, अमित चौगुले, सुनील पाटील, तानाजी पाटील, सुभाष देसाई केंद्रप्रमुख डी. आय. पाटील, वाय. के. चौधरी, सुभाष सावंत, जी. बी. जगताप, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले. या उपक्रमात गावा गावातील शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. 

No comments:

Post a Comment