भावी पिढी वाचण्यासाठी बालक जागृती अभियानात शिक्षकांनी सहभागी होऊन प्रयत्न करावेत - पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2021

भावी पिढी वाचण्यासाठी बालक जागृती अभियानात शिक्षकांनी सहभागी होऊन प्रयत्न करावेत - पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

माझा विद्यार्थी माझी जबाबदारी, या योजनेची सुरवात. 

कोल्हापूर येथे कोरोना बालक जागृती अभियानात ऑनलाईन शिक्षकांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री सतेज पाटील , शेजारी जिल्हाधिकारी दौलत देसाई , आमदार प्रा .आसगाकर

तेऊरवाडी - एस .के. पाटील / सी. एल. वृत्तसेवा

           कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ञानी वर्तवला आहे.  तिसऱ्या लाटेची मुलांच्या व पालकांच्या  मनामध्ये प्रचंड भीती आहे.ती भीती कमी करण्यासाठी कोरोना बालक जागृती अभियान २०२१ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे व भावी पिढी वाचण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करूया असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी केले. या बरोबरच यावेळी माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या योजनेस सुरवात करण्यात आली.

      जिल्हाधिकारी कार्यालयात बालक जागृती अभियाना अंतर्गत आयोजित ऑनलाईन  वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना  पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. 

     पालकमंत्री  श्री. पाटील पुढे  बोलताना म्हणाले, ``दोन दिवसात ऑफिशिअल प्रोटोकॉल तयार करून शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर मुलांच्यासाठीची कोरोना प्रतिबंधात्मक माहिती पाठवली जाईल. त्यासाठी शिक्षकांनी सर्वप्रथम येत्या आठ दिवसात इतर आजारांची लक्षणे असणाऱ्या मुलांची यादी तयार करावी , म्हणजे भविष्यात उपचारासाठी त्याचा उपयोग होईल. तसेच मुलांच्या मध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहेत. जिल्ह्यांमध्ये सध्या १५० मुलांचे दोन पैकी एक पालक गमावलेले आहेत. तर दोन मुलांचे दोन्ही पालक गमावलेले आहेत. अशा मुलांच्यासाठी मदतीचा हात देऊन पुण्याईचे काम करूया. या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी शासन घेत आहे .आठवड्यातून एक तास  शिपकांनी पालक आणि विद्यार्थी यांचे ऑनलाईन समुपदेशन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री पाटील यांनी केले.

            जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, ``मुलांचे भावनिक आणि शारीरिक जग बदलत आहे . त्यामुळे मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे . शिक्षकांनी या मुलांचे समूपदेशन करावे 

               आतापर्यंत  कोव्हीड योध्दा , ऑनलाईन अध्यापन , सर्वेक्षण ,लसिकरण इत्यादी कामात शिक्षकांचे योगदान खूप मोठे आहे . या मोहिमेत ही शिक्षक मागे राहणार नाहित असा विश्वास शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगावकर यानी व्यक्त केला .

     या वेबिनार मध्ये बालरोग तज्ञ डॉ. सरोदे, डॉ. सौ .कुंभोजकर, डॉ. बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,  आयुक्त कादंबरी बलकवडे , जिल्हाधिकारी दौलत देसाई , शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी  शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये कोरोनाचा प्रतिबंध  करण्यासाठी घ्यावयाची काळजी , मुलांचा ताप आणि ऑक्सिजन विषयीची माहिती, मानसिक स्थिती मध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी  शिक्षकांनी करावयाचे प्रबोधन , पालकांशी योग्यवेळी करावयाचा संपर्क याविषयी माहिती दिली. 

     या ऑनलाईन वेबिनार मध्ये  शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर , कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई , कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,  निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे , सीपीआर चे अधिष्ठाता श्री.माेरे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे  यांच्यासह इतर अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस हजर होते , तर ऑनलाईन वेबिनार मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी , विस्ताराधिकारी , केंद्रप्रमुख यांच्यासह मुख्याध्यापक , शिक्षक उपस्थित होते. या वेबिनार मध्ये जवळपास सात हजार शिक्षकांनी सहभाग घेतला होता. 

No comments:

Post a Comment