कानूर कोविड सेंटरला सुरेश वांद्रे फौंडेंशनकडून म्युझिक सिस्टम भेट - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2021

कानूर कोविड सेंटरला सुरेश वांद्रे फौंडेंशनकडून म्युझिक सिस्टम भेट

कानूर येथील कोविड केंद्रात म्युझिक सिस्टिम भेट देताना सुनील मोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर पाटील,डॉ. मुळे व डॉ प्रदीप पाटील.


चंदगड / सी. एल. वृत्तसंस्था

        चंदगड तालूक्यातील कानूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असणाऱ्या शासकिय कोविड सेंटरला कोवाड येथील कै. सुरेश वांद्रे फौंडेशन कडून दोन म्युझिक सिस्टम भेट देण्यात आली.

       महाराष्ट्र शासनाकडून चंदगड तालूक्यामध्ये चंदगड व कानूर येथे कोविड सेंटर चालू करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये सर्व सुविधा असल्या तरी म्युझिक थेरपीसाठी म्युझिक सिस्टिमची गरज होती. दोन दिवसापुर्वी गडहिंग्लज विभागाच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांनी या कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना म्युझिक थेरपीचा रुग्णावर किती चांगला परिणाम होतो याचे महत्व पटवून दिले होते. म्युझिक कानावर पडताच मनातील आजार हा थोड्या वेळासाठी का असेना  बाजूला सारला जाऊन रुगणांच्या मनात चांगले विचार  रुजतात व सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण होऊन रुग्ण उपचारासाठी प्रतिसाद देतो. त्यासाठी म्युझिक थेरपी बसविन्याबाबत सूचना केल्या होत्या.

       ही सर्व माहिती कोवाड येथील वांद्रे कुटुंबातील सदस्यांना समजल्यानंतर लागलीच त्यांनी म्युझिक किट उपलब्ध करून आज कानूर येथील कोविड सेंटर मध्ये राजगोळी येथील सुनील मोरे यांचे हस्ते पोच करण्यात आली.

       आज कोविड काळात कोणी कोणाचं नसताना माणसं एकमेकांपासून दूर जात असताना वांद्रे कुटुंबियांनी कोविड केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा विचार करून एक प्रकारची सामाजिक बांधिलकी जपली आहे.

No comments:

Post a Comment