एका मेंढ्याने केला घात, एकाच गोठ्यातील १६ दुभत्या म्हशींचा मृत्यू !कोठे झाली ही विचित्र घटना ? वाचा चंदगड लाईव्ह ! - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2021

एका मेंढ्याने केला घात, एकाच गोठ्यातील १६ दुभत्या म्हशींचा मृत्यू !कोठे झाली ही विचित्र घटना ? वाचा चंदगड लाईव्ह !

 


कागणी : सी. एल. वृत्तसेवा / एस. एल. तारीहाळकर

 म्हशींच्या गोठ्यात पाळलेल्या एका मेंढ्यामध्ये असणाऱ्या एमसीएफ या विषाणूच्या संसर्गाने एकाच गवळीच्या १६ दुभत्या म्हशींचा मृत्यू झाला. या विचित्र घटनेने संपूर्ण पशुवैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे. ही घटना घडली आहे बेळगाव येथे टिळकवाडीतील गवळी गल्लीत. 

 गवळी गल्लीतील पिराजी गवळी (चौधरी) यांच्या मालकीची 33 जनावरे होती. त्यांनी या जनावरासोबत एक मेंढाही पाळला होता. मात्र या मेंढ्यांमध्ये असणाऱ्या विषाणूंचा प्रादुर्भाव त्याच गोठ्यातील सोळा म्हशीवर झाला. दोन महिन्यात एक-दोन, एक दोन अशा एकूण सोळा म्हशींचा मृत्यू झाला. या गंभीर आजारावर अद्याप काहीच उपाय नाहीत. गत पन्नास वर्षापासून या रोगावर संशोधन सुरू आहे. बंगलोर येथील पशु संगोपन खात्याचे डॉ. शिवशंकर यांच्या पथकाने या रोगाने सदर म्हशींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या दरम्यान दोन महिन्यात एकूण सोळा दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला.


जनसंपदा फाउंडेशनचा पुढाकार.......

 शेतकऱ्याकडे असणारा हा मेंढा येथील जनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक परशुराम मंगनाईक यांनी सात हजारला खरेदी केला व त्याची विल्हेवाट लावली. पशुवैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेंढ्याला इंजेक्शन देऊन ठार करण्यात आले. यासाठी जनसंपदा फाउंडेशनचे सदस्य नितीन गोरे, मारुती तमुचे, भरमा मंगणाईक, महादेव मंगनाईक यांनी परिश्रम घेतले.


चंदगड लाईव्हतर्फे शेतकऱ्यांना विनंती....

 पशुपालक शेतकऱ्यांनी या घटनेचा बोध घेऊन आपल्या गोठ्यात मेंढा व म्हशी एकत्र पाळू नये. मेंढा पाळायचा असेल तर म्हशिंच्या गोठ्यात न पाळता मेंढ्यांचा गोठा अलग ठेवावा, जेणेकरून या रोगाची लागण आपल्या जनावरांना होणार नाही. माणसाला ज्या प्रकारे सर्दी असते त्याच प्रकारे मेंढ्यांना ही एक प्रकारची सर्दी असते. या सर्दीत मध्येच एमसीएफ हे विषाणू असतात. यामुळे मेंढ्यांना काही होत नाही, मात्र याचा गंभीर परिणाम व दुभत्या जनावरांना होऊ शकतो. त्यामुळे याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन तर्फे करण्यात येत आहे.No comments:

Post a Comment