ा ताशीव कड्यापासून केवळ दहा फूट आत असलेल्या गणेश तलावाचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगड वरील तलाव कोरडे पडल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या परिस्थितीला वन विभाग व पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाची दिरंगाई कारणीभूत आहे असा आरोप श पारगड रहिवाशांनी केला असून याप्रश्नी वेळ पडल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
दरवर्षी मार्च ते जून महिन्यात तलाव कोरडे पडतात. त्यामुळे निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात खीळ बसते. शिवाय गडावरील रहिवाशांना पाण्याअभावी अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून गडाच्या पूर्वेकडील राई परिसरातून पाणी आणण्यासंदर्भात योजना तयार आहे. तथापि योजनेची कागदपत्रे पाणी पुरवठा विभाग पंस.चंदगड कडून तीन वर्षे झाली तरी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेली नाहीत! असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी केला आहे.
४८ एकर क्षेत्रावर पसरलेला किल्ला बांधताना गडावरील रहिवाशी मावळे व घोडदळ आदींच्या पाण्याच्या सुविधेसाठी छत्रपती शिवरायांनी १६७६ सालि बांधलेले गणेश, गुंजन, महादेव व फाटक हे चार तलाव व विहिरी साडे तीनशे वर्षांपासून आज तागायत सेवा देत आहेत. तथापि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पाणी अपुरे पडत आहे. यातील तलाव व काही विहिरींची डागडुजी करण्याची योजना वन खात्याकडे मंजूर आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर परिक्षेत्र उपवनसंरक्षक काळे यांनी गडावर भेट देऊन याची पाहणी सुद्धा केली होती. पण कामाचा पत्ता नाही. सध्या तलावात पाणी नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी डागडुजी होणे गरजेचे आहे. तथापि वनखात्याकडून चालढकल सुरू आहे. असा आरोप रहिवासी करत आहेत.
शासनामार्फत 'राईतून' नळपाणी पुरवठा योजना राबविणे व किल्ल्यावरील तलाव, विहिरी डागडुजी ही कामे तात्काळ मार्गी लावावीत. अशी मागणी किल्ले पारगड रहिवाशी व पर्यटकांतून करण्यात आली आहे. ही दिरंगाई अशीच सुरू राहिल्यास तालुक्यातील दोन्ही कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, प्रकाश चिरमुरे आदी पारगड रहिवाशांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment