लक्कीकट्टे येथे धरणातील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू, वाचा......सविस्तर..... - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2021

लक्कीकट्टे येथे धरणातील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू, वाचा......सविस्तर.....

सुरज चिंचणगी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील धरणात पोहायला गेलेल्या माणगाव (ता. चंदगड) येथील सुरज दत्तू चिंचणगी (वय वर्षे - २२) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली.

       सुरज चिंचणगी हा आज सकाळी आपल्या मित्रांसमवेत लकीकट्टे येथील धरणात पोहायला गेला होता. तासभर पोहल्यानंतर दमछाक होऊन पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दिवसभर त्याच्या मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. चंदगड तालुक्यातील  माणगाव सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावात ही घटना घडल्याने लकीकट्टे धरणावर मोठा जमाव जमला होता. सुरज हा हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बीएस्सी भाग - तीन च्या वर्गात शिकत होता. बी. एस. एस्सी झाल्यानंतर त्याची सैन्यात जायची इच्छा होती. पण नियतीने त्याची ही इच्छा पूर्ण केली नाही. प्रामाणिक आणि हुशार असलेल्या सूरजच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व एक बहीण आहे. अंधार झाल्याने शोधकार्य थांबले आहे. उद्या सकाळी पुन्हा मृतदेह शोधण्यात येणार आहे. 

बाबू रे....बापाची हृदय पिळवटून टाकणारी हाक

       माणगाव येथील सूरज या युवकाचा लक्कीकट्टे धरणात बुडून मृत्यू झाल्याची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. यावेळी  सुरजच्या वडिलांनी `बाबू रे कूठे गेलास रे....` अशी मारलेली  हाक उपस्थितांची हृदय पिळवटून टाकणारी होती. 

माणुसकी हरवलीय काय...........

        सुरजच्या मृत्यूची घटना माणगांवमध्ये कळताच वडील व नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले होते. आपला मुलगा धरणात बुडून मयत झाल्याने पुत्र वियोगाने सुरजचे वडील दत्तु चिंचणगी यांनी २ वेळा धरणातील पाण्यात उडी घेतली. मात्र त्यांना वाचविण्यासाठी घटनास्थळी जमलेल्या चारशे ते पाचशे बघ्यांपैकी कोणीही पुढे आले नाही. याउलट या घटनेचे शुटींग करण्यातच अनेकजण गुंतले होते. त्यामुळे व्हाट्सअपच्या जमान्यात माणुसकी हरवलीय काय.........असा प्रश्न उपस्थित होत आहे. No comments:

Post a Comment