चंदगड तालुक्यात कोरोना 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' कामी १९५ शिक्षकांना आदेश, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणार - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2021

चंदगड तालुक्यात कोरोना 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' कामी १९५ शिक्षकांना आदेश, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणार

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या आणीबाणीच्या काळात कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय व नागरिकांचे 'कॉन्टॅक्ट ड्रेसिंग' करण्यासाठी चंदगड तालुक्यातील १९५ शिक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. सध्या अनेक शिक्षक केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बी एल ओ) तसेच कोविड लसीकरण केंद्र, चेकपोस्ट ड्युटी आदी कामात व्यस्त आहेत. त्यांना वगळून उर्वरित सर्व शिक्षकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कामकाज, हॉटस्पॉट गावांतील सर्वेक्षण कामी आदेश दिले आहेत. यामुळे १०० टक्के शिक्षक राष्ट्रीय कर्तव्यात व्यस्त राहणार आहेत. 

   कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आदेशित सर्व शिक्षकांना गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी व्हीसी द्वारे दोन दिवस प्रशिक्षण दिले. हे शिक्षक गावातील दक्षता कमिटी, ग्रामपंचायत, आशा व अंगणवाडी सेविका यांच्या समन्वयाने काम करणार आहेत. बाधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची नावे प्रथम संपर्क व द्वितीय संपर्क (हाय रिस्क) वर्गवारी करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतील. जेणेकरून या व्यक्तींना वेळेत स्वॅब देणे व उपचार घेणे सोपे होईल. आपल्या जीवावर धोका टाळण्यासाठी ही मंडळी आपल्याकडे येत असून त्यांना बाधित रुग्ण कुटुंबीय व संपर्कातील व्यक्तीने सहकार्य करण्याचे आवाहनही चंद्रकांत बोडरे यांनी केले यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार, सर्व केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती आभार विस्ताराधिकारी एम टी कांबळे यांनी मानले. याकामी प्रांताधिकारी विजया पांगारकर तहसीलदार विनोद रणवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment