श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती, श्रमदानातून रस्ते करणं हेच आमच्या नशिबीच का? नागरीकांचा सवाल? - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2021

श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती, श्रमदानातून रस्ते करणं हेच आमच्या नशिबीच का? नागरीकांचा सवाल?

चिखल आणि खड्ड्यांचा किटवाड- कुदनुर रस्ता श्रमदानातून दुरुस्तीची धडपड करताना किटवाड ग्रामस्थ.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         वर्षानुवर्षे दुरावस्थेत असलेल्या किटवाड ते कुदनुर चार किमी रस्त्याची किटवाड ग्रामस्थांनी नुकतीच श्रमदानातून दुरूस्ती केली. गावातील ज्ञान, सेवा, त्याग युवक मंडळाच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी उस्फूर्तपणे श्रमदान केले. गेल्या पंधरा वीस वर्षापासून रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरणाची मागणी असताना शासन व बांधकाम विभागाचे इकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे श्रमदानातूनच रस्ता दुरुस्ती नशिबी आहे का? असा उद्विग्न सवाल किटवाड ग्रामस्थांनी यावेळी केला.
रस्ता दुरुस्त करताना किटवाड ग्रामस्थ.

        गावाच्या दोन्ही बाजूला कृष्णा खोरे योजनेतून साकारलेली केवळ शंभर  फुट अंतरावरील दोन धरणे व जवळच असलेला धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पण जाण्यासाठी बारमाही रस्ता नाही. ग्रामस्थांना किटवाड ते कुदनूर रस्ता जास्त गरजेचा आहे. कारण बँक व्यवहार, बाजार, शैक्षणिक, रेशन व आजारी रुग्ण आदी मूलभूत गरजांसाठी कुदनूर व कालकुंद्री येथे जावे लागते. तथापि वर्षानुवर्षे मागणी करूनही रस्त्यांची दुरावस्था संपलेली नाही. तीन-चार वर्षांपूर्वी याच रस्त्यासाठी ग्रामस्थानी चंदगड बांधकाम कार्यालयासमोर केलेले भजन आंदोलन चर्चेचा विषय ठरले होते. त्यावेळी दिलेली आश्वासने हवेतच विरून गेली.

     उन्हाळ्यात खाचखळग्यातून कशीबशी वाहने नेली जातात पण पावसाळ्यात कुठलेच वाहन या रस्त्यावरून चालू शकत नाही.  ग्रामस्थांनी शेवटी श्रमदानाचा मार्ग अवलंबला. श्रमदानाची ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरूच आहे. विशेष म्हणजे या मार्गावर किटवाड गावा पर्यंत कुदनूर गावच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळे  या रस्त्याचा सर्वाधिक वापर कुदनूर ग्रामस्थ करत असले तरी अद्याप त्यांनी या रस्त्यासाठी श्रमदान केल्याचे ऐकिवात नाही. मात्र अतिक्रमण करून रस्त्याची रुंदी निम्म्यावर आणली आहे. एकंदरीत किटवाड ते कुदनुर व किटवाड ते कालकुंद्री या दोन्ही रस्त्यांची डांबरीकरणासह दर्जेदार बांधणी होण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment