कोवाड महाविद्यालयातर्फे कोरोनामुक्त गाव अभियान, ऑनलाईन प्रबोधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2021

कोवाड महाविद्यालयातर्फे कोरोनामुक्त गाव अभियान, ऑनलाईन प्रबोधन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माझे गाव कोरोनामुक्त हे प्रबोधनात्मक अभियान राबविण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या मदतीने ऑनलाईन प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच, सदस्य यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

          पहिल्या टप्प्यात कोवाड, किणी, तेऊरवाडी, दुंडगे, निदूर या पाच गावांतून ऑनलाईन प्रबोधनाची मोहीम राबविली असली तरी संपूर्ण चंदगड तालुक्यात हे अभियान राबविण्याचा संकल्प महाविद्यालयाने केला आहे. १ जून रोजी डॉ. अरुण खरे (नाशिक) यांचे कोरोना काळात आरोग्याची काळजी, ३ जूनला डॉ. शरद श्रेष्ठी (बेळगाव) यांचे कोरोना व बालकांचे आरोग्य व ५ जून रोजी डॉ. एस. डी. कदम (कोल्हापूर) यांचे झाडे लावा, झाडे जगवा आणि कोरोनाला पळवा या विषयावर मार्गदर्शन झाले. 

          यावेळी प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम झाला. त्यावर विषय तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिली. सरपंच अनिता भोगण (कोवाड), संदीप बिर्जे (किणी), राजू पाटील (दुंडगे) यांनी ग्रामपंचायत स्तरावरून कोरोनाला कसे थोपवता येईल, याविषयी मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी केली. डॉ. के. एस. काळे यांनी प्रास्ताविक केले. अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. दीपक पाटील, डॉ. के. एस. काळे, डॉ. ए. के. कांबळे यांनी विशेष सहकार्य केले. डॉ. कांबळे यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment