किटवाड धरण प्रकल्प ओव्हर फ्लो, धबधबा झाला सुरू, पहिल्या दिवसापासूनच पर्यटकांचा ओघ - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2021

किटवाड धरण प्रकल्प ओव्हर फ्लो, धबधबा झाला सुरू, पहिल्या दिवसापासूनच पर्यटकांचा ओघ


किटवाड धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो. पर्यटकांचे आकर्षण ठरलेली सांडव्यातील नागमोडी (झिगझॅग) भिंत.

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

        कालकुंद्री (ता. चंदगड) हद्दीतील किटवाड नजीकचे धरण क्रमांक १ काल दि. १९ जून रोजी रात्री पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यातील पाण्यामुळे तयार होणारा धबधबाही प्रवाहित झाला आहे. आज पहिल्याच दिवशी येथे परिसरातील उत्साही पर्यटकांनी गर्दी केली होती.

धडकी भरवणारा कालकुंद्री/ किटवाड धबधबा

        पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप शासन काळात कृष्णा खोरे विकास योजनेतून तत्कालीन आमदार व कृष्णा खोरे  महामंडळाचे सदस्य भरमूअण्णा पाटील यांच्या प्रयत्नातून हे धरण साकारले होते. तेव्हापासून परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्याचबरोबर या धरणातील सांडव्यात बांधलेली नागमोडी भिंत, जवळच असलेला धबधबा, त्यावर बांधण्यात आलेला लोखंडी पूल, किटवाड गावाच्या पूर्वेकडे कृष्णा खोरे योजनेतील धरण क्र. २ यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. गेल्या तीन-चार वर्षात बेळगाव परिसरातील पर्यटक आंबोली ऐवजी जवळचे ठिकाण म्हणून किटवाड ला पसंती देतात. दोन्ही गावातील तरुणांसाठी व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे.

       दरम्यान इथे येणारे अतिउत्साही पर्यटक येताना आणलेल्या काचेच्या दारू बाटल्या, पाण्यासाठी आणलेल्या प्लॅस्टिक बाटल्या व इतर वस्तू कालकुंद्री हद्दीतील नजीकच्या शिवारात फेकून देतात. याच्या जोडीला हुल्लडबाजी नित्याची झाली आहे. गेल्या चार-पाच वर्षात यात वाढच होत आहे. गतवर्षी बेळगावच्या दोघांनी या ठिकाणी आपले प्राणही गमावले आहेत. याचा मोठा त्रास शेतकरी बांधवांना होत आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन व हुल्लडबाजी रोखणे हे दोन्ही गावाच्या ग्रामपंचायती व कोवाड पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.
No comments:

Post a Comment