कोवाड बाजारपेठेते शिरले पुराचे पाणी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, काय आहे कोवाडमधील परिस्थिती.........वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

कोवाड बाजारपेठेते शिरले पुराचे पाणी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, काय आहे कोवाडमधील परिस्थिती.........वाचा......

कोवाड बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       धुवांधार पावसाने ताम्रपणी नदीचे पाणी गुरुवारी रात्रीच पात्राबाहेर पडले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी नदीवरील कोवाड, माणगांव बधारे पाण्याखाली गेले. दुपारी दोन वाजता कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारंबळ उडाली. पूर परिस्थितीचा धोका ओळखून प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

संततधार पावसामुळे कोवाड येथील पाण्याखाली गेलेला जुना बंधारा.

      कोवाड बंधारा पाण्याखाली गेला असला तरी शेजारी असलेल्या पूलावरुन प्रवाशांची वाहतूक सुरु होती. तळगुळी ,कालकुंद्री ,निट्टर व घुल्लेवाडी ओढ्यावरुन पाणी आले होते. तरीही लोकांची त्यातून ये-जा सुरु होती. कोवाड बाजारपेठेत दुपारी दोन वाजता पाणी आल्याने दिवसभर व्यापाऱ्यांची तारंबळ उडाली होती. दुकानातील माल बाहेर काढण्याचे काम व्यापारी करत होते. निट्टर रोडवरील नदीकाठच्या इमारतीमधून पाणी गेल्याने त्याठिकाणचे लोक सुरक्षित स्थळी जात होते. मंडल अधिकारी शरद मगदूम पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याने व्यापारी व नदीकाठच्या लोकाना ते खबरदारीच्या सूचना करत होते. 


         निट्टर रोडवरील नदीकाठच्या इमारतींच्या तळमजल्यातून पाणी गेल्याने नदीकाठावरील मार्ग बंद झाला होता. मागील दोन वर्षे येथील बाजारपेठेला पूराला धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्याना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. दिवसभार पाऊस सुरु असल्याने सायंकाळी पुन्हा पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे प्रशासनाने पाणी गेलेल्या इमारतीमधील लोकाना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना केल्या. पावसाचे प्रमाण वाढले तर शनिवारी निट्टररोडही बंद होण्याची शक्यत आहे.

     पुराचा कोवाड बाजारपेठेला धोका असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी ठेवून खबरदारी घ्यावी. तसेच नदीकाठच्या इमारतीमधील लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन सरपंच अनिता भोगण यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment