कोवाड येथे ताम्रपर्णीचे पाणी पात्राबाहेर, रेस्क्यू पथकाचे पाण्यात प्रात्यक्षिक, व्यापाऱ्यांना खबरदारीच्या सुचना - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2021

कोवाड येथे ताम्रपर्णीचे पाणी पात्राबाहेर, रेस्क्यू पथकाचे पाण्यात प्रात्यक्षिक, व्यापाऱ्यांना खबरदारीच्या सुचना

कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीच्या पूरात चंदगड रेस्क्यू पथकाचे प्रात्यक्षिक घेताना मंडल अधिकारी शरद मगदूम,  उपसरपंच पुंडलिक जाधव, पोलिस प्रशासन व इतर.

चंदगड / प्रतिनिधी

     सलग तीसऱ्या दिवशी पावसाने जोर कायम ठेवल्याने आज ताम्रपर्णी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. पहिल्याच पावसात नदीला पूर आला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी कोवाड बंधारा पाण्याखाली गेला. त्यामुळे दुपारी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने चंदगड रेस्क्यू पथकाचे पाण्यात प्रात्यक्षिक घेण्यात आले. पाण्याची पातळी सायंकाळी वाढल्याने कोवाड मंडल अधिकारी शरद मगदूम यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कोवाड बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्याना खबरदारीच्या सुचना केल्या आहेत. 

तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचे प्रमाण असेच वाढले तर शुक्रवारी सकाळी दुंडगे, कामेवाडी व माणगांव बंधारेही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने महसूल विभागाने नदीकाठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवार पासून चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळीच पूर परिस्थिती निर्माण झाली. दुपारी नदीपात्राबाहेर पाणी पडल्याने कोवाड बंधारा पाण्याखाली गेला. कामेवाडी,  दुंडगे व कामेवाडी बंधाऱ्यांच्याह काटोकाट पाणी आले आहे. कालकुंद्री येथील सुनंदा जोतीबा पाटील यांचे घर पडून दोन लाखांचे नुकसान झाले. निटूर, घुल्लेवाडी, कुदनूर, कडलगे, होसूर व किणी येथील ओढ्याना पाणी आल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे. 

No comments:

Post a Comment