दातृत्वातील 'यशवंत' हरपला, एक्वानचे यशवंत नांदवडेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2021

दातृत्वातील 'यशवंत' हरपला, एक्वानचे यशवंत नांदवडेकर यांचे निधन

यशवंत नांदवडेकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील गवसे गावचे सुपुत्र व मुंबईस्थित ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक यशवंत कृष्णा नांदवडेकर यांचे २५ जून २०२१ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे 'दातृत्वातील यशवंत हरपला' अशा प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

                                                   जाहिरात

जाहिरात

      चंदगड तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात गवसे सारख्या विकसनशील गावात जन्म घेतलेल्या यशवंत यांनी उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली. मुंबई येथे आर. के. कन्स्ट्रक्शन सुरू करून उद्योग जगतात पाऊल ठेवले. मुंबई येथील तात्यासाहेब मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक होते. चंदगड येथे एक्वान मिनरल वॉटर हा उद्योग सुरू केला. २०१९ च्या विध्वंसक महापुरात अडकलेल्या अनेक गावातील शेकडो नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम केले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षात थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, पत्रकार अशा फ्रंटलाईन वर्कर्स साठी त्याचबरोबर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना मोफत पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे पुण्यकर्म सुरूच होते.  'उद्योग आणि दातृत्व हे सहसा एकत्र नांदत नाहीत.' मात्र यशवंत नांदवडेकर याला अपवाद ठरले. उद्योजक असूनही  समाजसेवा हा त्यांचा पिंड होता. आपल्या उद्योजकतेमुळे त्यांनी अनेक हातांना काम देऊन अनेक कुटुंबात वसंत फुलवला आहे. त्यांच्या समाजसेवी वृत्तीमुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे. त्यामुळेच 'जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला!' ही उक्ती यशवंत नांदवडेकर यांच्या बाबतीत खरी ठरली. त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे त्यांचे कुटुंबीय व कामगार वर्गावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
No comments:

Post a Comment