चंदगडला मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, सुमारे दोन तास मुसळधार पाऊस - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2021

चंदगडला मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, सुमारे दोन तास मुसळधार पाऊस

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात सर्वत्र मान्सूनपूर्व  पावसाने आज जोरदार हजेरी लावली. तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडत होता. सायंकळी चारच्या  सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. या पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. हा पाऊस किणी कर्यात भागात केलेल्या धुळवाफ पेरण्याना पोषक ठरणारा आहे.  

         अचानक सुरु झालेल्या पावसामुळे दुचाकी चालक भिजत प्रवास करताना दिसत होते. काही लोक पावसापासून वाचण्यासाठी कॅरी बॅग डोक्याला लपेटून व प्लॅस्टीकचे कागद घेवून मोटरसायकलवरुन प्रवास करत होते. या पावसामुळे भात तरवे व पेरण्यांना प्रारंभ होणार आहे. आजच्या पावसामुळे बरेच दिवस खोळंबलेल्या शेतीकामांना गती येणार असून शेतीकामांची लगबग सुरु होणार आहे. खते व बि-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. खते, बि-बियाणे, औत व मजुरीचे दर वाढल्याने शेतक-याला शेती करणे अवघड झाले आहे. भरपूर शेती असली तरी वर्षभर पुरेल इतके धान्याचे उत्पन्न मिळणारी शेती सोडून उर्वरीत शेतीमध्ये वर्षभरानंतर येणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे त्यांचा कल आहे.
No comments:

Post a Comment