आशा स्वयंसेविकांना १ हजार रुपये अधिक भत्ता, कामात अडथळा आणल्यास गुन्हे दाखल होणार - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2021

आशा स्वयंसेविकांना १ हजार रुपये अधिक भत्ता, कामात अडथळा आणल्यास गुन्हे दाखल होणार

 कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        गाव पातळीवर प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन प्रत्येक घटकाला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या अशा सेविकांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर  भत्ता देण्याचे लेखी आदेश जि. प. कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. चंदगड तालुक्यातील आशा स्वयंसेविकातून या आदेशाचे स्वागत होत आहे.

          जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका दररोज घरोघरी फिरून आरोग्य संबंधी सर्व प्रकारचे सर्वेक्षण करत असतात. सध्या कोरोना महामारीच्या काळात कोरोना सदृश्य लक्षणे आढळलेले, लसीकरण झालेले, न झालेले, व्याधीग्रस्त अशा सर्वेक्षणची कामे वाढली आहेत. त्यामुळे त्यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता व कोरोना संबंधी लागणारी सुरक्षा साधने देण्याचे लेखी आदेश सीईओ चव्हाण यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत. तसेच कोरोना संबंधी शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करत असताना त्यांना दमदाटी होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत त्यामुळे त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सीईओंनी दिले आहेत.

     सीईओंच्या या आदेशाने आशा स्वयंसेविकाना दिलासा मिळाला असला तरी ग्रामपंचायतींनी याची तत्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या धोकादायक परिस्थितीत एक दिवसही सुट्टी न घेता अथक मेहनत घेणाऱ्या आशां ना दरमहा मिळणारे केवळ दिड-दोन हजार रुपये तुटपुंजे मानधनही वेळेत मिळत नसल्याची खंत असून ते नियमित  मिळावे. अशी मागणी होत आहे.
No comments:

Post a Comment