अडकूर -गणूचीवाडी सस्त्याची झालेली दुर्दशा. |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर ते गणूचीवाडी (ता. चंदगड) हा दोन कि. मी. लांबीचा रस्ता अखेरच्या घटका मोजत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे अन् त्या खड्यात भरलेले पाणी आणि चिखल पाहिले कि गणूचीवाडी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी कोणी रस्ता देता का रस्ता? अशी आर्त हाक ऐकायला मिळत आहे.
अडकूर ते गणूचीवाडी हा घटप्रभा नदी ओलांडून जाणारा रस्ता १५ वर्षापूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सध्या रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे.वाहन चालवताना खूप कसरत करावी लागते. रस्त्याच्या आजूबाजूने कुंपन व झुडपामुळे अत्यंत निमुळता बनलेल्या या रस्त्यावर चिखलात दुचाकी पडून खूपवेळा किरकोळ अपघात पण झाले आहेत. तर या खड्यामध्ये ऊसाची वाहतूक करणारी अवजड वाहने सतत अडकून पडतात. यामुळे वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गावात बस जात नाही. तसेच या गावची मुख्य बाजारपेठ अडकूरच आहे. शिक्षण, दवाखाना, बाजार, बँका यासाठी येथील नागरीकांना याच रस्त्यावरुन अडकूरला यावे लागते. पण हा रस्ता खाच -खळग्यांचा असल्याने जिथे चालणे अवघड तेथून वाहनधारकांची काय तारांबळ उडत असेल याचा विचारच न केलेला बरा. गावात केवळ चौथी पर्यंतच शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना याच रस्त्यावरून पायी चालत अडकूरला यावे लागते. या सर्वांसाठी रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे या विभागाच्या लोकप्रतिनिधीनी या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी गणूचीवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment