नेसरीतील निराधार गंधवाले कुटुंबाला आधार, २१ हजारांची आर्थिक मदत, कोणी केली, वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2021

नेसरीतील निराधार गंधवाले कुटुंबाला आधार, २१ हजारांची आर्थिक मदत, कोणी केली, वाचा......

नेसरी :  निराधार गंधवाले कुटुंबाला २१ हजाराची रोख आर्थिक मदत सुपूर्त प्रसंगी माजी प्राचार्य आर. बी. पाटील, मार्तंड कोळी, रवींद्र हिडदूगी, अमोल बागडी, उमेश दळवी, अभिजित कुंभार, सुरेश गवळी आदी.


नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

       सन २००८ साली दुस-याच्या घरी धुणी-भांडी करणा-या नेसरी ( ता. गडहिंग्लज) येथील श्रीमती विजयमाला गंधवाले या गरीब महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या पाच ते दहा वयाच्या पाच लहान मुली अनाथ झाल्या. आधीच या मुलींच्या वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे या पाच नातींची जबाबदारी वृध्द आजीवर होती. गंधवाले कुटुंबियांवर ओढावलेल्या आघाताची दखल घेवून सामाजिक कार्यकर्ते रविंद्र हिडदुगी यांच्या पुढाकारातून सामाजाच्या हातभारातून आर्थिक मदत जमा झाली होती.  

          त्यापैकी निराधार गंधवाले कुटुंबीयांना २१ हजाराची आर्थिक मदत येथील रवळनाथ हौसिंग को ऑपरेटिव्ह संस्था शाखाध्यक्ष  आर. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते मार्तंड कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली. मदतीबाबत बोलताना हिडदुगी म्हणाले, ``सन २००८ साली  विजयमाला गंधवाले या गरीब महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. आधीच वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे  पाच ते दहा वयाच्या पाच लहान मुली अनाथ झाल्याने  पाच नातींची जबाबदारी वृध्द आजीवर होती. दरम्यान या कुटुंबाची व्यथा वृत्तपत्रातून छापून आली होती. बातमी वाचून गडहिंग्लजचे प्रतिष्ठित व्यापारी कै. रावसाहेब कित्तुरकर यांच्या कुटुंबीयांनी पाच हजारांची मदत दिली.  मी व सहकाऱ्यांनी  आणखी पाच हजारांची आर्थिक मदत गोळा केली व झालेल्या मदतीची ठेव पावती करण्यात आली. सदर ठेवीचे सहा- सात वर्षापूर्वी २० हजार ४०० रुपये झाले. पैकी १०४०० रू. इंदुबाई गंधवाले यांना एका कार्यक्रमात वाटप झाली. 

         उर्वरित दहा हजार रुपये येथील रवळनाथ को ऑपरेटिव्ह हौसिंग संस्थेत परत ठेवण्यात आले. सदरची रक्कम नुकतीच दुप्पट झाली. दरम्यान याच कार्यक्रमात आर. बी. पाटील व मार्तंड कोळी यांनी मिळून एक हजार मदत जाहीर केली. अशी एकूण २१ हजार  मदत आजी इंदुबाई गंधवाले यांना सुपूर्त केली. यावेळी आर. बी. पाटील व कोळी यांनी मनोगते व्यक्त केली. अमोल बागडी यांनी स्वागत केले. अभिजित कुंभार यांनी आभार मानले.  मॅनेजर किरण कोडोली, सुरेश गवळी, उमेश दळवी आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment