ज्वालामुखी व भूकंपाने हाहाकार माजवलेल्या कांगोतील नागरिकांसाठी भारतीय आर्मी ठरली देवदूत! सेव्हन मराठा लाईट इन्फंट्रीची अतुलनीय कामगिरी - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2021

ज्वालामुखी व भूकंपाने हाहाकार माजवलेल्या कांगोतील नागरिकांसाठी भारतीय आर्मी ठरली देवदूत! सेव्हन मराठा लाईट इन्फंट्रीची अतुलनीय कामगिरी

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ल्हाव्हा रस असा बाहेर पडला होता. 

कांगो / गोमा सिटी 

       गेल्या काही दिवसात आफ्रिकेतील कांगो देशातील गोमा शहराजवळच्या न्यायरागोंगो या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या अतिप्रचंड तप्त लाव्हारसामुळे कित्येक घरे नष्ट होऊ लागली. मोठमोठे वृक्ष पेट घेऊ लागले. लोकवस्तीकडे वेगाने येणाऱ्या लाव्हारसाने शेकडो माणसे व पाळीव प्राण्यांचे बळी घेतले. जीवाच्या आकांताने लोक सैरावैरा धावू लागले. सर्वत्र हाहाकार माजला. या लाव्हारसाचा दुष्प्रभाव पंचवीस तीस किलोमीटर परिसरातील सजीव सृष्टी वर झाला. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. सर्वस्व गमावलेले हजारो नागरिक रवांडा आणि उत्तर-पश्चिम साके शहराकडे स्थलांतर करत होते. रस्त्यावर अवतरलेल्या या निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे एकच अंदाधुंदी माजली होती. अशा वेळी तिथे अवतरले इंडियन आर्मीचे देवदूत! अर्थात मराठा रेजिमेंट मधील मराठा इन्फंट्री चे मराठमोळे जवान.

               गेल्या काही वर्षांपासून कांगो देशात शांतता राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र शांती सेनेच्या माध्यमातून भारतीय लष्कराबरोबरच उरुग्वे, पाकिस्तान, बांगलादेश, युक्रेन, दक्षिण आफ्रिका, मोरॉक्को, सेनेगल, मलावा, नायजेरिया, ब्राझील, पॅराग्वे, रशिया आदी देशांचे लष्करही तैनात आहे. तथापि ही शांतिसेना आपले शत्रूच आहेत अशा समजुतीने जवानांना अपशब्द वापरणे, लष्करी वाहनांवर दगडफेक करणे असे प्रकार कांगो वासिया कडून घडायचे. 

          पण यावेळी भारतीय लष्कराच्या वतीने शांतिसेना बनून गेलेल्या  मराठा रेजिमेंट मधील सेव्हन मराठा लाईट इन्फंट्री च्या जवानांनी तेथे जाताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने मोहिमेला सुरुवात केली.

      कांगोत पाऊल ठेवताच त्यांचे स्वागत केले अक्राळविक्राळ ज्वालामुखीने! तिथे गेल्यापासून मराठा जवानांनी जिवाची पर्वा न करता ज्वालामुखीच्या तडाख्यातून या अविकसित देशातील हजारो लोकांचे प्राण वाचवले. धगधगता ज्वालामुखी वातावरणात पसरलेली प्रचंड राख, यातच भरीस भर म्हणून  पंधरा दिवस अखंडपणे बसणारे भूकंपाचे धक्के, सुविधांची कमतरता यामुळे कांगो वासियांचे जीवन नर्क बनले होते. अशा कठीण परीस्थितीत केवळ जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी या त्रिसूत्रीवर काम करून नरक यातना भोगणाऱ्या सैरभैर नागरिकांचे पुनर्वसन करण्यात सेव्हन मराठा इन्फंट्रीने अभूतपूर्व योगदान दिले. या कामगिरीमुळे यातील जवान, अधिकारी व सरदार या छत्रपतींच्या मावळ्यांनी कांगोतील सर्वपक्षीय नेते व जनतेची मने जिंकलीच याशिवाय शांती सेनेतील इतर देशांचे जवान, अधिकारी, युनायटेड नेशनचे अधिकारी यांच्याही प्रशंसेस पात्र ठरले. काही दिवसापूर्वी लष्करी वाहनांवर दगडफेक करत शिव्या देणारे तेथील नागरिक आता भारतीय लष्कराचे जवान दिसताच थँक्यू इंडियन आर्मी! इंडियन आर्मी बहुत अच्छा! असे आदराने बोलताना दिसत आहेत. हा बदल घडला संकटकाळी लोकांच्या मदतीला धावून गेल्यामुळे. गरजेनुसार अन्न, पाणी , निवारा यासोबत संकटाशी मुकाबला करण्याची हिंमत व धीर दिल्यामुळेच! 

        सेव्हन मराठाच्या कर्तबगार जवानांनी यानिमित्ताने आपल्या उत्तुंग कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय सेनेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे हे मात्र नक्की!!! 

         मराठी बाण्याच्या कर्तबगार, कर्तव्यनिष्ठ मावळ्यांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. त्यांच्या कामगिरीला सी. एल. न्युजचा मानाचा मुजरा!



No comments:

Post a Comment