पत्रकारांचे विविध मागण्यांसाठी शरद पवारांना साकडे, काय आहेत मागण्या......... - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

पत्रकारांचे विविध मागण्यांसाठी शरद पवारांना साकडे, काय आहेत मागण्या.........

पत्रकारांचे विविध मागण्यांसाठी शरद पवारांची भेट घेवून गाऱ्हाणे मांडण्यात आले. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए आणि बीयुजे या संघटनांच्या एका शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज  शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली.  यावेळी "पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू" असे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

       राज्यात १४२ पत्रकार कोरोनाचे शिकार ठरले असताना देखील सरकार पत्रकारांच्या विषयाकडे पूर्णता दुर्लक्ष करीत असल्याची बाब ही शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.. पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील हल्ले, पत्रकार आरोग्य योजना, अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण, मुंबईतील पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्याची सुविधा आदि विषय देखील शिष्टमंडळाने पवार यांच्या कानावर घातले आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती त्यांना केली.

      शिष्टमंडळात एस. एम. देशमुख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, बीयुजेचे जॉइन्ट सेक्रेटरी सुरजसिंह ठाकूर आदि सहभागी झाले होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे दीपक कैतके उपस्थित होते. पत्रकारांच्या वरील संघटनांनी यापुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याची विनंती केली आहे. यावेळी एस. एम. देशमूख यांनी संघर्षाची पंच्याहत्तरी हे मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारे तसेच कथा एका संघर्षाची ही दोन पुस्तके शरद पवार यांना भेट दिली.

No comments:

Post a Comment