कोल्हापूर जिल्ह्यात अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोणा चाचणी केली जाणार - जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2021

कोल्हापूर जिल्ह्यात अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोणा चाचणी केली जाणार - जिल्हाधिकारी दौलत देसाई

जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा

          कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा वाढलेला रुग्णदर  कमी होण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहर व ग्रामीण भागामध्ये अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे घोळक्याने गप्पा मारत बसणे, जेवणाचे कार्यक्रम करणे, भाजीपाला तसेच किराणा घेण्यासाठी गर्दी करणे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी पोलीस व संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडून याबाबत निर्बंध आणून या पथकासोबत कोविड तपासणी पथकही दिले जाईल व अशा व्यक्तींची जाग्यावरच अँटीजन टेस्ट  करण्यात येईल. तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरते वाहन ठेवण्याचा निर्णय  बैठकीत घेण्यात आला.

      जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली,  यावेळी ते बोलत होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अधिक असून यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व नागरिकांनी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, घर अपुरे असल्यास घरातील एका बाधित व्यक्तीकडून कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर द्या. फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेंतर्गत कार्यरत दुकानदार व कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर यांची अँटिजेन तपासणी करुन घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या विक्रीस बंदी घाला. नेमून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरु असल्यास अशी दुकाने बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

      या बैठकीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment