शाळा बंद असल्याने शैक्षणिक साहित्याची विक्री करणारे व्यवसाय अडचणीत, वाचा काय आहे सद्यस्थिती........ - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2021

शाळा बंद असल्याने शैक्षणिक साहित्याची विक्री करणारे व्यवसाय अडचणीत, वाचा काय आहे सद्यस्थिती........

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       दरवर्षीप्रमाणे यावर्षी १५ जून नंतर शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरु होऊ शकले नसले तरी ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. त्याअनुषंगाने शिक्षकांना इयत्तेनुसार शाळेत उपस्थितीच्या सूचना केल्या आहेत. पण प्रत्यक्षात यंदाही शाळा, महाविद्यालये सुरु होणार की बंद राहणार याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्याची खरेदी-विक्री मंदावली आहे. विक्रेत्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेली दोन वर्षे पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरु होत नसल्याने शैक्षणिक साहित्याची विक्री करणारे व्यवसाय अधांतरी झाले आहेत. 

      गेल्या वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे नववी पर्यंतच्या परीक्षा झाल्याच नाहीत. तरीही सर्वच इयत्तांचे निकाल लागले. दरम्यान पुढील शैक्षणिक वर्ष नियोजित वेळेत सुरु झाले नाही. त्यामुळे पुस्तके,वह्या यासह शैक्षणिक साहित्यांची खरेदी-विक्री थांबली. सप्टेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याच्या सुचना केल्या. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या जास्त होती. त्याठिकाणी शाळा सुरुच झाल्या नाहीत. पण जिथं कमी प्रमाण होते. त्याठिकाणी विद्यार्थी संख्येवर मर्यादा घालून वर्ग सुरु झाले. ऑक्टोंबर नंतर कोरोनाचे प्रमाण वाढल्याने सुरु झालेले वर्ग पुन्हा बंद झाले. प्राथमिक शाळा तर सुरुचं झाल्या नाहीत. सर्वच इयत्तेच्या वर्गाना ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला विद्यार्थी वह्या, पुस्तके, कंपास, पेन, गाईडस,दप्तर, छत्री, चप्पल यासह अनेक  शैक्षणिक साहित्यांची खरेदी करतात. विद्यार्थी संख्या विचारात घेऊन दरवर्षी विक्रेते शैक्षणिक साहित्यांची जानेवारी महिन्यापासूनचं खरेदी करुन दुकानात साठा करुन ठेवतात. पण गेल्या दोन वर्षापासून शाळाच सुरु नसल्याने शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीकडे विद्यार्थी व पालकानी पाठ फिरविली आहे. विक्रेते आर्थिक अडचणीत सापडल्याने व्यवसाय अधांतरी झाले आहेत.

     शैक्षणिक साहित्यांची विक्री करण्यासाठी स्वतंत्र दुकाने सुरु केली आहेत. पण शाळाच सुरु होत नसतील तर आमचे धंदे कसे चालणार. वह्या,पुस्कते खरेदीत मोठी गुंतवणूक केलेली असते. विद्यार्थीच खरेदीसाठी येत नसतील तर काय करावे,असा विचार येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा तिसरी लाट येणार असा तज्ञांनी अंदाज व्यक्त केल्याने हे वर्षही रिकामेच जाणार का,असा प्रश्न विक्रेत्यांच्याकडून विचारला जात आहे.No comments:

Post a Comment