मंगळवारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, हवेत वाढतोय गारठा.. - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2021

मंगळवारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, हवेत वाढतोय गारठा..


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
      गेल्या दोन दिवसापासून पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने शिवारं पाण्याने तुंबली आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गार हवा,ढगांचा कडकडाट आणि सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. वातावरणात आर्द्रता वाढल्याने गारवा वाढला आहे. ताम्रपर्णी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. एकंदरीत पहिल्याच मान्सूनच्या पावसाने हवेत गारठा निर्माण झाला आहे. 

      सोमवार पासून तुरळक स्वरुपात पाऊस सुरु आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. पुन्हा उघडीप मिळत होती. पण दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवारी सायंकाळी अचानक ढग जमा झाले आणि जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्रभर पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. बुधवारी सकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे शेतातून पाणी तुडूंब भरले. बांध फूटून अनेक ठिकाणी खागी पडली. ओढ्याना पाणी आल्याने ओढ्यांचे पाणी शिवारांतून शिरले. डोक्यावर पाऊस घेऊन शेतकरी शेतात तुंबलेले पाणी बाहेर काढण्याचे काम करत होते. शेतकऱ्यांचे यामध्ये मोठा त्रास झाला. पाऊस थांबत नसल्याने शेतातून पाणी वाढत होते. रोप लागणीसाठी हा पाऊस पोषक असल्याने कांही शेतकरी मात्र बुधवारी रोप लागणीची कामे करताना दिसत होते. अजून चार दिवस असाच पाऊस राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

 चंदगड पाटबंधारे उपविभागाच्या माहिती प्रमाणे आजची धरणातील पाणीपातळी - तालुक्यातील एकूण प्रकल्पाची १ जूनपासून सरासरी  टक्केवारी  54.22 टक्के.

प्रकल्पाचे नाव व कंसात टक्केवारी  -

मध्यम प्रकल्प - घटप्रभा (102.63), जांबरे (60.80) व जंगमहट्टी (26.32) 

लघु पाटबंधारे प्रकल्प - आंबेवाडी (41.61), दिंडलकोप (31.63), हेरे (14.72), जेलुगडे (22.78), कळसगादे (8.52), करंजगाव (33.77), खडकओहोळ (19.71), किटवाड क्र.1 (34.77), किटवाड क्र.2 - (41.43), कुमरी (27.41), लकिकट्टे (51.04), निट्टूर क्र.2 (26.27), पाटणे (29.80), सुंडी (32.20), काजिर्णे (43.63)




No comments:

Post a Comment