दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा
दोडामार्ग तालुक्यातील तिलारीवाडी येथे भक्षाच्या शोधात जंगलातून आलेल्या बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग केला. तथापि विहिरीत पडून दोघांचाही मृत्यू झाला. कोनाळ वन परिमंडळ कार्यक्षेत्रात येणाऱ्या तिलारीवाडी येथील किशोर शेट्ये यांच्या घरालगतच्या विहिरीत ही घटना घडली. "शिकार करने आया था, खुदही शिकार हो गया!" या उक्तीची या घटनेने प्रचिती आणून दिली.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल पानपट्टे व वनपाल शिरवलकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्या व कुत्रा यांना बाहेर काढले. शेट्टी यांनी बिना पायऱ्यांच्या या विहिरीत मोटर पंप बसवला असल्याने विहिरीकडे सहसा कोण जात नाही. पण दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी पाहणी केली असता प्रकार लक्षात आला. दोन तीन दिवसापूर्वी ही घटना घडली असावी. मृत्यू झालेला बिबट्या वाघ सात ते आठ वर्षाचा पूर्ण वाढ झालेला होता. असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याला दफन करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रीतम पोकळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
पंधरा दिवसापूर्वी किल्ले पारगड नजीकच्या तेरवन येथे बिबट्याने गोठ्यातील गायीवर हल्ला करून ठार केले होते. तिलारी राखीव जंगल क्षेत्रात बिबट्या वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
No comments:
Post a Comment