कोरोनाने मयत शिक्षकाच्या कुटुंबियांना दाटे केंद्रातून मदतीचा हात, 'अनुकंपा खाली नोकरीसाठी सहकार्य करू' -सभापती - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2021

कोरोनाने मयत शिक्षकाच्या कुटुंबियांना दाटे केंद्रातून मदतीचा हात, 'अनुकंपा खाली नोकरीसाठी सहकार्य करू' -सभापती

कै. राजेंद्र तुपे यांच्या कुटुंबियांना मदत निधी देताना मान्यवर व शिक्षक.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील कानडी शाळेत कार्यरत असणाऱ्या राजेंद्र नारायण तुपे, वय ३९ रा. नेसरी ता. गडहिंग्लज (मुळगाव गोंदवले, जि. सातारा) यांचे मागील महिन्यात कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना चंदगड तालुक्यातील दाटे केंद्रातील शिक्षकांनी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देऊन सामाजिक भान जपले.

राजेंद्र नारायण तुपे
    मयत तुपे हे शासकीय आदेशानुसार कोव्हीड-१९ कर्तव्यावर असताना कोरोना बाधित झाले होते. उपचार सुरू असताना आठ दिवसात त्यांचे निधन झाले. घराचा कर्ता आधारस्तंभ गेल्यामुळे पत्नी व लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कानडी शाळेत बदली होण्यापूर्वी ते केंद्र शाळा दाटे येथे कार्यरत होते. येथील शिक्षकांनी परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांना मदतीचा हात पुढे केला. जमा केलेली ही मदत चंदगड पंस. चे सभापती ॲड. अनंत कांबळे, गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार, विस्ताराधिकारी एम टी कांबळे, केंद्रप्रमुख जी बी जगताप, केंद्र मुख्याध्यापिका सौ मंगल भोसले, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष परशराम सातार्डेकर, अध्यापक विश्वनाथ गावडे, प्रकाश पाटील, सौ तुर्केवाडकर आदींच्या उपस्थितीत तुपे यांच्या नेसरी येथील निवासस्थानी प्रदान करण्यात आली. यावेळी सभापती कांबळे यांनी तुपे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा योजनेखाली नोकरी कामी लागणारी कागदपत्रे विनाविलंब सादर करण्यासह शासनाकडून मिळणारी अन्य मदत मिळवून देण्यासाठी पंचायत समिती व शिक्षण विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल अशी हमी दिली.

No comments:

Post a Comment