झाडे लावा, झाडे जगवा हा मूलमंत्र जपा - कृषीअधिकारी किरण पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2021

झाडे लावा, झाडे जगवा हा मूलमंत्र जपा - कृषीअधिकारी किरण पाटील

विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपे देवून त्यांचे महत्व सांगण्यात आले. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र जपला पाहिजे. प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो. त्यामुळे वृक्षारोपण काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन चंदगड तालुका कृषीअधिकारी किरण पाटील यांनी केलं. चंदगड तालुक्यातील मराठी विद्यामंदिर हुंबरवाडी आणि विद्यामंदिर माणगाववाडी या शाळांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. हा उपक्रम अभिजीत किल्लेदार, उत्तम वाडीकर, दिपक जोतिबा गावडे यांच्या नियोजनातून आणि तुकाराम पट्टेकर यांच्या संकल्पनेतून झाला. 

        कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि दक्षीणेकडील भागाला लाभलेली निसर्गसंपदा यामुळे चंदगडची आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.महाराष्ट्र , कर्नाटक आणि गोवा सिमाभागावर वसलेला चंदगड तालुका येथील घनदाट वृक्षवल्ली पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र शासनाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी दिलेली गती महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमिवर मराठी विद्यामंदिर हुंबरवाडी आणि माणगाववाडी या दोन्ही शाळांच्या सौजन्याने नुकतेच वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व कळावे, निसर्गाशी जवळीकता वाढवी, निसर्गाबद्दल त्यांच्या मनात प्रेम उत्पन्न व्हावे, आपल्या सभोवतालच्या निसर्गाचा आपल्या जीवनासाठी काय महत्त्व आहे, हा उद्देश समोर ठेवून हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चंदगड तालुका कृषीअधिकारी किरण पाटील म्हणाले, निसर्गाच्या विरूद्ध कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसगार्चे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.आपल्या देशात जमीनही आहे आणि लोकांकडे पुरेसा वेळही. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो. निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणरक्षण करू शकू. आंबा, फणस, चिंच, जांभूळ, दालचिनी, केळी, अशोक, पिंपळ, शेंगा यांसारखी झाडे सर्वत्र लावण्याची प्रामुख्याने गरज आहे. आजच्या काळातील पारंपारीक शेती त्याला आधुनिकतेची जोड कशी द्यायची, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. आभार मराठी विद्या मंदीर हुंबरवाडी शाळेचे मुख्याध्यापक विलास भोगाणे यांनी मानले. सूत्रसंचालन विनायक पवार यांनी केलं. यावेळी कार्यक्रमास मारुती पट्टेकर, सुनिता चिगरे, प्रकाश चिगरे, विकास पाटील, राजू बेनके, मराठी विद्या मंदीर हुंबरवाडी शाळेचे मुखाध्यापक विलास भोगाणे, विद्या मंदीर माणगाववाडीचे शिक्षक गौडाडकर, शिरोडकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment