![]() |
ओढा पात्रात ठीकठिकाणी बांधलेले असे बंधारे प्रवाहाला अडथळा ठरत आहेत. |
विशाल पाटील / कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने होसूर, किटवाड कडून येणाऱ्या ओढ्यामुळे कालकुंद्री, कुदनुर शिवारातील शेकडो एकर जमीन व पिकांचे नुकसान झाले. गेल्या काही वर्षात वारंवार घडणाऱ्या प्रकाराची संबंधित विभागाने कारणे शोधून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
'चंदगड' पूर्व भागात वैजनाथ डोंगर रांगांच्या खोऱ्यात मोठे पाणलोट क्षेत्र आहे. हे सर्व पाणी एकत्र होऊन मोठ्या ओढ्याच्या स्वरूपात दुंडगे गावानजीक ताम्रपर्णी नदीला मिळते. याच ओढ्यावर किटवाड गावाच्या पश्चिमेकडे कृष्णा खोरे योजनेतील धरण क्रमांक १ तर पूर्वेकडे कर्नाटकातील हांदिगनूर परिसरातून येणाऱ्या ओढ्यावर धरण क्रमांक २ बांधले आहे. या दोन्ही ओढ्यांचा प्रवाह पुढे सुमारे सहा किलोमीटर वरील नदीपर्यंत एकत्रितपणे वाहतो.
![]() |
ओढ्याच्या प्रवाहाने कालकुंद्री- कुदनुर रस्ता व शेतीचे झालेले नुकसान. |
धरणे जुलै महिना संपण्यापूर्वीच ओव्हरफ्लो होतात. नंतरच्या मुसळधार पावसात पाणी पात्रात मावत नाही. हा अति वेगवान झोत लगतच्या दोनशे ते तीनशे मीटर अंतरातील शेती व पिकांचे नुकसान करत पुढे वाहतो. प्रवाहाबरोबर आलेले दगडधोंडे जमिनीत पडतात, जमिनीची धूप होते, गाळामुळे कमी उंचीचे पिके दबून जातात, ऊस पिकांचेही मोठे नुकसान होते. दरवर्षी पावसाळ्यात असे तीन-चार वेळा घडत असते. हे पाणी कालकुंद्री कुदनुर रस्त्यावरून कडून रस्ता व लगतच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
किटवाड ते ताम्रपर्णी नदी पर्यंत उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी ठीक ठिकाणी कॉंक्रीट बंधारे बांधले आहेत. हेच बंधारे पावसाळ्यात प्रवाहाला अडथळा ठरून आपल्या मुळावर आले आहेत. (फायद्यापेक्षा नुकसानच जास्त) असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय प्रवाह बदलण्यास कारणीभूत अन्य बाबींचा शोध घ्यावा. शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसानभरपाई देण्याऐवजी कारणे शोधून उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. या मुख्य ओढ्या बरोबरच परिसरातील कालकुंद्री- कागणी, कुदनुर- तळगुळी, राजगोळी बुद्रुक- राजगोळी खुर्द गावांदरम्यान असणारे छोटे ओढे संबंधित गावांचे मोठे नुकसान करत आहेत. याचीही कारणमीमांसा करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment