आमदार राजेश पाटील यांनी होसुर गावाला दिलेला शब्द पाळला.......... - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2021

आमदार राजेश पाटील यांनी होसुर गावाला दिलेला शब्द पाळला..........

आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         होसुर (ता. चंदगड) या गावाच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयीन इमारत बांधकामासाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन होसूर ग्रामस्थांना दिलेला शद्ब आमदार राजेश पाटील यानी केवळ एका महिन्यातच पाळला. दिलेला शद्व पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील यांचे आभार मानले.  

         होसूर ग्रामपंचायतीला सन २००८ सालापासून स्वतःची इमारत नव्हती. इमारतच  नसल्याने भाडोत्री जागेत ग्रामपंचायतीला आपला कारभार करावा लागत होता.  ग्रामपंचायतीला स्वतःची जागा होती, पण बांधकामासाठी पैसे नाहीत अशी स्थिती होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते एस. एल. पाटील, सरपंच राजाराम नाईक, ग्राम पंचायत सर्व सदस्य आणि होसुर विकास मंचचे सर्व पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने गावात ग्रामपंचायत कार्यालयासाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी आमदार राजेश पाटील यांच्याकडे  महिन्याभरापूर्वी पाठपुरावा केला. त्यावर आमदार राजेश पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयास शासनाकडून निधी आणण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. नामदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशाने गावास तब्बल २० लाखाचा निधी मंजूर झाला. त्यापैकी अग्रीम रक्कम म्हणून साडेसात लाख रुपये तात्काळ ग्रामपंचायतीला वर्ग करण्यात आले. त्याचा अध्यादेश काल दिनांक १ जुलै २०२१ रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. या तातडीने  केलेल्या मदतीबद्दल आमदार राजेश पाटील यांनी नामदार मुश्रीफ यांचे मनापासून आभार मानले. 

            होसुर हे गाव  कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील हद्दीवरचे गाव. अशा सिमा भागातील गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री मुश्रीफ यानी केलेल्या मदतीबद्दल संपूर्ण ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांचेही आभार मानले. भविष्यकाळात आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण गाव ठामपणे उभा राहील अशा पद्धतीचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.

No comments:

Post a Comment