![]() |
ओढ्यांनी पात्र बदलल्याने पिके पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहे. |
माणगाव / सी. एल. वृत्तसेवा (नंदकुमार ढेरे)
चार दिवसांपूर्वी पडलेल्या मूसळधार पावसाने डोंगर द-यातून वाहून आलेल्या अतिपाण्यामुळे तांबुळवाडी, डुक्करवाडी, बागिलगे येथील गावाजवळून वहाणार्या हांज ओढ्यांच्या पात्राची दिशाच बदलली.डोंगरातून वाहून आलेले दगड, गोटे, माती व झाडे झुडपे शेतात वाहून आल्याने ओढ्या जवळील पिकांचे प्रचंड नुकसान नुकसान झाले आहे. या पाण्याच्या अतिरिक्त प्रवाहामूळे शेतातील बांध फुटून जागो जागी भगदाड पडली आहेत. भात, ऊस, नाचना आदी पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
मूसळधार पावसाने डुबा, बारी, सातेरी टेक या डोंगर दर्यातून येणारे पाणी गावाजवळून वहाणार्या ओढ्यातून थेट ताम्रपर्णी नदीत जाते. मात्र ताम्रपर्णी नदीलाच महापूर आल्याने या ओढ्यातील पाण्याला तुंब लागली. परिणामी पाणी पुढे जात नसल्याने ओढ्याला भगदाड पडून ओढ्याचे पात्रच बदलले. शिवारात उभ्या पिकात दगड, माती, झाडे, झुडपे जाऊन पिकेच मातीत गाडली गेली. डूक्करवाडी, तांबुळवाडी, बागिलगे गावाजवळून गेलेल्या ओढ्याजवळील दहा एकरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी करून भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच राजू शिवणगेकर यांनी केली आहे.
प्रत्यक्ष पाहणी करुन भरपाई देण्याची मागणी
अति पावसाने ओढ्याचे पात्र बदलून शेतात शिरल्याने बांधाचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्यामुळे शासनाने नेमलेल्या अधिका-यानी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी.
नारायण पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी, तांबुळवाडी.
No comments:
Post a Comment