कर्यात भागात पावसाचे थैमान, अनेक मार्ग जलमय, शेतीचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2021

कर्यात भागात पावसाचे थैमान, अनेक मार्ग जलमय, शेतीचे नुकसान

किटवाड ओढ्यांचे पाणी असे कालकुंद्री- कुदनुर रस्त्यावरून अर्धा किलोमीटरपर्यंत वाहत आहे.


विशाल पाटील / कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

     गेल्या दोन दिवसात पावसाचा कहर सुरू असल्यामुळे चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातील अनेक मार्ग जलमय झाले आहेत. अनेक ओढे, नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे. कोवाड बाजारपेठेवर महापुराची टांगती तलवार कायम आहे.

कोवाड बंधार्‍यावरून वाहणारे ताम्रपर्णी नदीचे पाणी.

         किटवाड नजीकची दोन्ही धरणे यापूर्वीच भरल्याने दोन्ही ओढ्यांचे पाणी कालकुंद्री- कुदनुर रस्त्यावरुन वाहत असून अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता पाण्याखाली आहे. याशिवाय तळगुळी तसेच राजगोळी खुर्द नजीकच्या ओढ्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे कुदनुर- राजगोळी मार्ग बंद  आहे. कालकुंद्री ते कागणी दरम्यानच्या ओढ्यावर सहसा पाणी येत नाही तथापि आज सकाळच्या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे कोवाड कडे जाणारी वाहतूक काही काळ बंद होती.

अति पावसामुळे कागणी- कालकुंद्री रस्त्यावर आलेले ओढ्याचे पाणी.

       घुलेवाडी ते निटूर दरम्यानच्या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे सकाळपासून माणगाव- कोवाड वाहतूक बंदच आहे. त्यामुळे वाहनधारकांना जक्कनहट्टी व सांबरे मार्गे कोवाड परिसरात यावे लागले. कागणी गावालगतच्या गॅरेज जवळून जाणारा ओढा तुंबल्यामुळे हे  पाणी कोवाड बेळगाव रस्त्यानजीकच्या शेती व पिकांचे नुकसान करत किणी रस्त्यावरून वाहत होते त्यामुळे कोवाड ते किणी रस्ता वाहनांसाठी बंद झाला आहे. ओढे-नाल्यांच्या पात्रात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे परिसरातील अनेक ओढ्यांचे पाणी शिवारात घुसले यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

       दरम्यान दुपारी दोन वाजता ताम्रपर्णी नदी चे पाणी कोवाड बंधार्‍यावरून दोन फूट वाहत होते. पावसाचा जोर आणखी दोन दिवस असाच राहिल्यास नदीला महापूर येण्याचा संभव आहे. संभाव्य धोका ओळखून कोवाड बाजारपेठेतील व्यापारी व नदीपात्रालगत च्या ग्रामस्थांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment