चंदगड तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, प्रलंबित मागण्यासाठी संघटनेचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

चंदगड तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, प्रलंबित मागण्यासाठी संघटनेचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

सहा. गटविकास अधि. संतोष जाधव यांच्याकडे निवेदन देताना परशराम जाधव व चंदगड तालुका ग्रामपंचायत संघ पदाधिकारी.

चंदगड / सी. एल .वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपाचा इशारा दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघ (आयटक संलग्न) शाखा चंदगडच्या वतीने नुकतेच गटविकास अधिकारी चंदगड यांना देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष परशराम जाधव (कोवाड) यांनी दिली.

         सुधारित किमान वेतन लागू करून फरक मिळावा, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावे, कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फरकासह दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा, दरवर्षी पावसाळ्यात छत्री, रेनकोट, बॅटरी आदी सुविधा पुरवाव्यात, प्रा. फंड खाते अपडेट करावे, शासन निर्णय १०/०८/२०२० च्या तरतुदीनुसार उर्वरित वेतन ग्रामपंचायत स्वनिधीतून अदा करण्याचे आदेश व्हावेत, कोकरे येथील कोरोनाने मयत कर्मचारी रवळनाथ सुतार यांच्या वारसांना विमा कवच रक्कम मिळावी, आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष परशराम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, सचिव एकनाथ राघोजी, औदुंबर देवणे, देवाप्पा गावडे, उमाजी देवळी आदींच्या सह्या आहेत. पं. स. चंदगड येथे सहा. गटविकास अधिकारी संतोष जाधव, विस्तार अधिकारी बाळासाहेब कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.

No comments:

Post a Comment