जंगमहट्टी येथील मध्यम प्रकल्प ओवरफ्लो, चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाला दिलासा, पूर्व भागातील शेती आणि बहुतांशी गावांचा पाणी प्रश्न निकालात, वाचा कोणत्या गावांना होणार लाभ..... - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

जंगमहट्टी येथील मध्यम प्रकल्प ओवरफ्लो, चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाला दिलासा, पूर्व भागातील शेती आणि बहुतांशी गावांचा पाणी प्रश्न निकालात, वाचा कोणत्या गावांना होणार लाभ.....

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. 

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाचा आधारस्तंभ असलेल्या जंगमहट्टी येथील मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने प्रकल्प 100 टक्के भरला आहे. सध्या पाणी सांडव्यावरून थेट होनहाळ नाल्याच्या पात्रात पडत आहे.  हा मध्यम प्रकल्प भरल्याने चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील जंगमहट्टी सह माडवळे, तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, मजरे कारवे, मौजे कारवे, मांडेदुर्ग, ढोलगरवाडी सह माणगाव पासून कामेवाडी पर्यंतच्या किणी कर्यात भागातील शेतकऱ्यांची शेती व संपूर्ण गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.             

          धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचे प्रमाण प्रमाण अत्यल्प आहे. मात्र मागील तीन-चार दिवसात सगळीकडे महापूर आला असताना या परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.या मध्यम प्रकल्पाची क्षमता 1.22 टीएमसी इतकी आहे. गुरुवार अखेर या परिसरात एकूण 1947 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 15 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 1230.11 दशलक्ष घनफूट इतका आहे. गुरुवारी सायंकाळपासूनच या धरणाच्या सांडव्यावरून हळूहळू पाणी होनहाळ नाल्यात पडत होते.  हा प्रकल्प भरल्याने या प्रकल्पावर आधारित असलेल्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

          प्रकल्प पर्यटकांची मांदियाळी मात्र कोरोनामुळे ब्रेक 

जंगमहट्टी मध्यम प्रकल्प म्हणजे बेळगाव सह बेळगाव जिल्ह्यातील व गडहींग्लज, कोल्हापूर, त्याचबरोबर कोकणातून ही काही पर्यटक या धरणावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नेहमी येत असतात. मात्र गेल्या वर्षी पासून कोरणामुळे या सगळ्या पर्यटकांना ब्रेक लागला आहे. त्याच बरोबर धरणाच्या फाट्यापासून ते धरणापर्यंत जाणारा रस्ताची अवस्थाही अतिशय वाईट असल्याने या रस्त्यावरून प्रवास करून धरणाकडे जाणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे पर्यटकांनी आणि प्रवाशांनी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे.

                       आजही धरणाची सुरक्षा रामभरोसे...

 जंगमहट्टी मध्यम प्रकल्पावर पर्यटनासाठी विविध भागातून पर्यटक नेहमी येत असतात. उन्हाळ्यात तर या ठिकाणी ओल्या पार्ट्यांची मेजवानी नेहमीच असते कित्येक वेळा विविध माध्यमातून या धरणाच्या सुरक्षे बाबतचा प्रश्न मांडण्यात आला आहे.  मात्र आजही या धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे.  धरणाच्या भिंतीवरून पलीकडे सांडव्यापर्यंत लोक नेहमी ये जा करत असतात. दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन या धरणावरून पर्यटक नेहमी फिरत असतात. मात्र येथे एक साधा वॉचमन सुद्धा शासनाने ठेवलेला नाही. त्यामुळे ही सुरक्षा रामभरोसे आहे. धर्माच्या व पाणलोट क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या धरणावर कायमस्वरूपी वाचमन नेमावा अशी मागणी होत आहे.

                  धरण पाणलोट क्षेत्रात पाटबंधारे खात्याचे कौतुक...

  यावर्षी दरवर्षीपेक्षा मुसळधार पाऊस या परिसरात कोसळत आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून सुरूवातीच्या काळात या धरणातील पाणी साठा पाटबंधारे विभागाने कमी केला. त्यामुळे मध्यंतरी आलेल्या महापुराच्या दरम्यान हे धरण भरले नाही. त्यामुळेच कोवाड आणि किणी कर्यात भागात महापुराचा तडाखा 2019 पेक्षा कमी जाणवला. नपेक्षा फार मोठा तडाखा याही वेळेसही बसून अपरिमित नुकसान झाले असते. त्यामुळे या उत्कृष्ट नियोजनाबद्दल या परिसरात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment