चंदगड तालुक्यात बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2021

चंदगड तालुक्यात बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

                    

अलबादेवी (ता. चंदगड) येथे बैलांची गोंडे बांधुन पूजा करताना परशराम चौकुळकर व सौ.संगीता चौकूळकर हे शेतकरी कुटुंब 

चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे) 

  चंदगड तालुक्यात महाराष्ट्रीयन बेंदुर(चिखल बेंदूर) पारंपारिक पध्दतीने  उत्साहात साजरा  करण्यात आला. सकाळी शेतकरी वर्गाने वर्षभर साथ देणाऱ्या बैलांची पूजा करुन हा सण साजरा केला. सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घातली त्यानंतर शिंगाना आकर्षक रंगरगोटी केली तर शिंगाना रंगीबीरंगी गोंडे बाधले, सांयकाळी घरातील सर्व सदस्यांनी बैलांची पूजा करुन उडऱ्यांचा नैवेद दाखवला नंतर बैलांच्या गळ्यात रुढी पंरपरेनुसार उडऱ्यांची माळ बांधण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळवुन भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान सकाळी घरातील जाणती वयस्कर माणसं मोहोळापासून ओळया(दोरी) पासवायची. ओळयामध्ये पळसाचे पान व वाक घातला जातो. वाक म्हणजे पळसाचे मुळ जाझवून त्याचे पार चिप्पाड बनवून त्याचे धाग्यात रुपांतर झाले की ते ओळयामध्ये रंगवून घातले जायचे . याचे गोंडेही केले जायचे. पूर्वीची वयस्कर माणसे हा वाक बनवायची. पूर्वीची नांगर ,जु, गूट्टा, हेंडोरं, पेसाटी, बैलगाडी, तीटं, कोळपा, फावडे(खोरे) या शेती आवजारांची पुुुजा करण्यात आली.

            बारा महिने तेरा काळ शेतात राब राब राबणाऱ्या बैलाचा आज आनंदाचा दिवस .चंदगड तालुक्यात बैलपोळा हा सण आज उत्साहाने साजरा करण्यात आला. दमदार पावसाच्या सरी असल्याने या सणावर थोडे विरजण आले असले तरी शेतात राबणाऱ्या बैलाच्या बैल मालकाने अतिशय उत्साहानं काही ठिकाणी सजावट करून त्यांची पूजा केली. दाराला पिंपळाच्या पाण्याचे तोरण बांधून घराचा उंबरा सजवला जातो. चंदगडच्या पूर्व भागात कर्नाटकी बेंदूर सण साजरा केला जातो तर पश्‍चिम भागामध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो .आज बैलजोडी मालकांनी बैलांना सकाळीच गरम पाण्याची आंघोळ घालून शिंगे रंगवून कपाळी बाशिंगे बांधली होती आणि शिंगाना गोंडे बांधून बैलांची सजावट केली होती .काही हौशी बैल मालकाने खूप सुंदर अशा बैलांना सजवलं होतं. बाहेर पावसाचा जोर असल्याने घरीच बैलांची भक्तिभावे पूजा करून त्यांना गोड नैवेद खाण्यास देण्यात आला. वास्तविक पाहता बेंदूर -बैलपोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात पुरण पोळीचा निवेदने साजरा होत असतो परंतु संपूर्ण चंदगड तालुक्यात मात्र हा सण मांसाहारी जेवणाचा बेत आखून साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment