'कृषी संजीवनी मोहिमेची' चंदगड तालुक्यात सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2021

'कृषी संजीवनी मोहिमेची' चंदगड तालुक्यात सांगता

 किणी येथे कृषी संजीवनी मोहीम सांगता प्रसंगी उपस्थित कृषी अधिकारी व मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुका कृषी विभागामार्फत राबविलेल्या कृषी संजीवनी मोहिमेची  १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन अर्थात 'कृषीदिन' चे औचित्य साधून किणी, ता. चंदगड येथे सांगता करण्यात आली.

        महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या  वतीने दरवर्षी २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी मोहीमेचे आयोजन करण्यात येते. या काळात शेतकरी बांधवांना शेती आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजनांची माहिती दिली जाते. यात सिंचन सुविधा, पाणी पुरवठा व व्यवस्थापन, फळबाग लागवड, विविध पिके व संकरित वाणांची माहिती, गांडूळखत, सेंद्रीय खत व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, शेतकरी अपघाती मृत्यू विमा योजना आदी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. किणी येथील सांगता कार्यक्रमात अशा योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी यशोदीप पोळ यांनी दिली. अध्यक्षस्थानी सरपंच संदीप बिर्जे होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, कोवाड मंडळ अधिकारी अक्षय गार्डे, तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजीत दावणे, कृषी पर्यवेक्षक सतीश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच जोतिबा हुंदळेवाडकर, ग्रामविकास अधिकारी बी ए खवरे, पोलीसपाटील रणजित गणाचारी, विष्णू मणगुतकर, लक्ष्मण जोशिलकर, ग्रामपंचायत व अष्टविनायक शेतकरी मंडळाचे सदस्य, शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. प्रस्ताविक पी जे मोहनगेकर यांनी केले संजय कुटे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment