पेट्रोल चोरीमुळे वाहनधारक त्रस्त, पेट्रोल-डिझेल महागल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2021

पेट्रोल चोरीमुळे वाहनधारक त्रस्त, पेट्रोल-डिझेल महागल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पेट्रोल डिझेल पंप

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          पेट्रोलचे दर भडकल्याने अगोदरचं वाहनधारकांना धडकी भरली असताना आता पेट्रोल चोरीचे नवे संकट निर्माण होत आहे. रात्रीच्यावेळी घराबाहेर लावलेल्या वाहनांतील पेट्रोल चोरीच्या घटना घडल्या आहेत. एक दोन दिवस नव्हे तर सातत्याने पेट्रोलची चोरी होत असल्याने वाहनधारकांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी पेट्रोल चोरीच्या घटनांवर आवर घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. 

          रात्रीच्यावेळी घराबाहेर लावलेल्या वाहनांतील पेट्रोल चोरले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून गावा-गावात पेट्रोल चोरीची चर्चा होत आहे. पण पुढे येऊन कुणीही पोलिसांत तक्रार करायला तयार नाहीत. बुधवारी रात्री कोवाड पोलिस चौकीच्या परिसरातचं काही नोकरदारांच्या गाड्यातील पेट्रोल चोरीला गेल्यानंतर पेट्रोल चोरीचे खरे चित्र समोर आले आहे. यामध्ये कांही सराईत लोक असल्याचा लोकांचा संशय आहे. पेट्रोल चोरीच्या प्रकारामुळे वाहनधारक धास्तावले आहेत. पेट्रोलची चोरी प्रकारामुळे पार्किंगची सोय नसलेल्या वाहनधारकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी पेट्रोल चोरीला आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्याबरोबर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment