प्रशासनाची वाट न पाहता लाकडी गेट करून ग्रामस्थांनी धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना रोखले, वाचा सविस्तर... - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2021

प्रशासनाची वाट न पाहता लाकडी गेट करून ग्रामस्थांनी धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना रोखले, वाचा सविस्तर...

किटवाड : येथील धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकाना ग्रामपंचायतीने असे रोखले.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

किटवाड (ता. चंदगड) ग्रामस्थानी प्रशासनाची वाट न पाहता रविवारी धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकाना गावच्या वेशीबाहेरचं रोखले. कोरोनाच्या भितीमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गावच्या वेशीबाहेर लाकडी गेटने रस्ता बंद करून दिवसभर तरुणानी पहारा ठेवून आलेल्या पर्यटकाना माघारी पाठविले. अंदाजे पाचशेच्यावर आलेले पर्यटक नाराज होऊन माघारी फिरले. यामुळे रविवार असूनही  धबधब्याचा परिसर शांत होता.  

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही किटवाड धबधब्यावर पर्यटक गर्दी करत होते. विशेषतः कर्नाटकातील पर्यटकांची संख्या जास्त असते. आलेले पर्यटक गावात विनामास्क फिरत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना कोरोनाचा  धोका वाढला होता. धबधब्यालगत गावाची वस्ती असल्याने ग्रामपंचायतीने पर्यटकाना बंदी घातली होती . उपसरपंच महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यानी तहसीलदार व पोलीस स्टेशना निवेदन देवून पर्यटकाना बंद करण्याचे आवाहन केले होते.  त्याअनुषंगाने ग्रामस्थानी स्वतःच पर्यटकाना धबधब्याकडे येण्याला मज्जाव केला. रविवारी सकाळी गावच्या वेशीबाहेर रस्त्यावर लाकडी गेट लावून पर्यटकाना अडवले. धबधब्याकडे कुठल्याही मार्गाने पर्यटक जाणार नाहीत याची ग्रामपंचायतीने काळजी घेतली होती. तसे नियोजन केले होते. दिवसभर शेकडो पर्यटक आले होते. पण सर्वानाच माघारी पाठविले. अनेकानी विनंत्या केल्या. ओळखी काढून जाण्याचा प्रयत्न केला पण ग्रामस्थानी कठोर निर्णय घेतल्याने पर्यटकांच्यात नाराजी निर्माण झाली.

सध्या कोरोना अजून संसर्ग वाढत असल्याने आम्ही धबधब्याकडे पर्यटकाना बंदी घातली आहे. येणाऱ्या पर्यटकाना गावातून ये जा करावी लागते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यासाठी पर्यटकानी ग्रामपंचायतीच्या आवाहनाला सहकार्य करावे. महेश पाटील (उपसरपंच)

No comments:

Post a Comment