आईच्या निधन प्रसंगी दोन्ही पुत्र सीमेवर तैनात! कर्तव्य श्रेष्ठ ची दिली प्रचिती कृष्णाबाई चव्हाण यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2021

आईच्या निधन प्रसंगी दोन्ही पुत्र सीमेवर तैनात! कर्तव्य श्रेष्ठ ची दिली प्रचिती कृष्णाबाई चव्हाण यांचे निधन

कै श्रीमती कृष्णाबाई चव्हाण


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

निपाणी (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथील कृष्णाबाई गोविंद चव्हाण, वय ९७ यांचे दिनांक १२ जुलै २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले. सुप्रसिद्ध स्वातंत्रसैनिक कै. गोविंदमामा चव्हाण यांच्या त्या पत्नी तसेच भारतीय आर्मीतील अधिकारी गजानन चव्हाण व रवींद्र चव्हाण यांच्या मातोश्री होत्या. ९७ वर्षांच्या असूनही त्यांचे प्रकृतिमान ठणठणीत होते त्यांच्या आकस्मिक निधनाने ७ मराठा व १२ मराठा रेजिमेंट मधील जवानांवर शोककळा पसरली आहे.

गणेशोत्सवावेळी उपस्थित पुत्र सुभेदार मेजर गजानन व सुनबाई सौ कविता समवेत कृष्णाबाई. 

    १९४२ च्या छोडो भारत चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धासह चीन, पाकिस्तान व बांगलादेश मुक्ती अशा चार लढाया गाजवलेल्या निडर जवान गोविंदराव चव्‍हाण यांची पत्नी तसेच सीमेवर लढणाऱ्या दोन अधिकारी पुत्रांची माता होत्या. कृष्णाबाई मुलांच्या गैरहजेरीत दरवर्षी गणेशोत्सव साजरा करायच्या. या कामी त्यांना सुनबाई सौ कविता व सौ विजया यांची साथ लाभत असे. देशाच्या सीमेवर तैनात सर्व सैनिक हे आपलेच पुत्र आहेत या भावनेतून त्यांच्या यश व दीर्घायुष्यासाठी गणरायाकडे प्रार्थना करायच्या.

कृष्णाबाई यांचा चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान करताना उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिव चेतन शेरेगार, संतोष सुतार व निपाणी येथील प्रतिष्ठित नागरिक.

मातोश्रींच्या निधन समयी कर्तव्य श्रेष्ठ मानणाऱ्या त्यांच्या दोन्ही पुत्रांना अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. त्यांचे एक पुत्र गजानन चव्हाण सुभेदार मेजर हे '७ मराठा रेजिमेंट' मधून हजारो किलोमीटर दूर दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेचिराख झालेल्या गोमा शहरवासीयांच्या सेवेत व्यस्त आहेत. तिथेही त्यांनी आपल्या कार्यातून आई-वडील, छ. शिवराय व भारतीय आर्मी चे नाव उज्वल केले आहे. गेल्या चार महिन्यापासून शांती सेनेच्या माध्यमातून कांगो देशात कर्तव्यावर आहेत. 'वसुधैव कुटुम्बकम' अर्थात जग हेच आपले कुटुंब ही शिकवण मातेकडूनच मिळाल्याने ते परदेशातही संकटातील लोकांची सेवा करत राहिले. दुसरीकडे शांती सेनेतून त्यांच्या सोबत गेलेल्या इतर सैनिकांची मोठी जबाबदारीही त्यांच्यावर आहे. कृष्णाबाई यांचे दुसरे पुत्र सुभेदार रवींद्र चव्हाण १२ मराठा रेजिमेंटमध्ये असून सिक्कीम सीमेवर शत्रू सैन्याशी दोन हात करत आहेत. मातोश्रीच्या निधनानंतर दोन तीन दिवसानंतर निपाणी येथील घरी पोहोचले आहेत.
   गणेशोत्सवात गणरायाची प्रतिष्ठापना करून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व जवानांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालणाऱ्या दोन्ही रेजिमेंट मधील सैनिकांत एक वेगळा आदरभाव होता. कृष्णाबाई यांच्या निधनामुळे सैनिकांवरील हा वरदहस्त कायमचा अनंतात विलीन झाला आहे.
स्वातंत्र्यसैनिक पती आणि दोन अधिकारी पुत्रांसमवेत श्रीमती कृष्णाबाई.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सुना यांच्यासह अनुसया, विमल, मंगल, कमल व सुनीता या पाच मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.No comments:

Post a Comment