कवितेचे नाव - 'आर्त हाक', कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली सुंदर कविता - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2021

कवितेचे नाव - 'आर्त हाक', कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली सुंदर कविता

 

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर आयोजित कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती कविता. 

•स्पर्धेचे परीक्षक होते, प्रतिथयश जेष्ठ कवि चंद्रकांत पोतदार • स्पर्धेतील सहा अनुक्रमे विजेत्या कविता चंदगड तालुक्याचे मुखपत्र असलेल्या "चंदगड लाईव्ह न्यूज पोर्टल चॅनेल ने" वाचकांसमोर मांडल्या याला आमचे सबस्क्रायबर व वाचकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्या सर्वांचे सी एल न्यूज कडून मनःपूर्वक आभार!

 कोरोना महामारीमुळे शाळा किंबहुना शिक्षणाची सर्व द्वारे बंद आहेत. शिक्षक व पालकांना गेल्या दोन वर्षापासून मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बंद असलेली शिक्षणाची कवाडे खुली करावी यासाठी देवाकडे आर्त विनवणी करणाऱ्या एका विद्यार्थ्याची प्रार्थना कवयित्री सुचिता भातकांडे हिने शब्दबद्ध केली आहे. कोरोना च्या निमित्ताने शिक्षक तथा गुरूचे महत्त्वही अधोरेखित करणारी ही कविता आपणास नक्कीच आवडेल.


                     आर्त हाक

होईन शहाणा म्हणून माझं

घातलं शाळेत नाव 

नशीब माझं फुटकं अन्

'कोरोना' ने घातला घाव 

शाळाच आहेत बंद, आता काय करू

देवा... होईल का रे शाळा सुरु ||धृ||


वही, पेन अन् पुस्तक 

यांची तुटून गेली मैत्री 

शाळेशिवाय शिक्षण नाही 

याची आता झाली खात्री

ऑनलाइन शिक्षणाने संस्काराची, काय अपेक्षा करू

देवा... होईल का रे शाळा सुरु ||१||


वय माझे बागडण्याचे

करावी वाटते मस्ती

पण सगळेच दम देतात 

कर मास्क, सॅनिटायझर ची दोस्ती

वाटतं रे मलाही; चला दोस्ता संगे फिरू 

देवा... होईल का रे शाळा सुरू ||२||


'अबकड' शिकेन म्हणतो 

म्हणेन 'एबीसीडी' 

आयुष्याची सुरुवात माझी 

अन् कोमेजली शिक्षणाची नाडी

कितीतरी दिवसांनी माझे, भेटतील का रे गुरु 

देवा... होईल का रे शाळा सुरू ||३||


देशाचे भवितव्य म्हणे 

आहेत लहान मुले 

शालेय बागेत लगडतील 

विद्या रुपी सज्ञान फुले 

सारखे वाटते देवा, ज्ञानाची कास धरू 

देवा... होईल का रे शाळा सुरू ||४||


पुरे झाली देवा आता 

आमची सत्त्वपरीक्षा 

होतील शाळा सुरू 

तर वाढतील ज्ञानाच्या कक्षा 

होउदे आता आमचा जीवन प्रवास सुरु 

देवा... होईल का रे शाळा सुरू ||५||


     कवयित्री - कु. सुचिता सुखदेव भातकांडे, कालकुंद्री, ता. चंदगड


No comments:

Post a Comment