बुक्कीहाळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ व वाहनधारकांचे हाल - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2021

बुक्कीहाळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ व वाहनधारकांचे हाल

 

बेळगाव मार्गावरील फाट्यापासून बुक्कीहाळ बुद्रुक ते बक्कीहाळ खुर्द दरम्यान खाचखळग्यांनी भरलेला रस्ता.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
कोवाड- बेळगाव मार्गापासून बुक्कीहाळ बुद्रुक व बुक्कीहाळ खुर्द गावांच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन्ही गावातील नागरिकांना बाजारहाट, वैद्यकीय, शैक्षणिक, बँक आदी अनेक कामांसाठी कोवाड किंवा बेळगाव कडे जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्याची नव्याने बांधणी करावी अशी मागणी होत आहे.
    चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात वैजनाथ डोंगररांगांच्या दक्षिणेकडे कौलगे, बुक्कीहाळ खुर्द, बुक्कीहाळ बुद्रुक, कल्याणपूर ही दुर्गम गावे येतात. हत्ती, गवे, रानडुक्कर, मोर आदी वन्य प्राण्यांचा नेहमीच उपद्रव असणाऱ्या या गावांना कोवाड- बेळगाव या मुख्य रस्त्याला जोडणारा चार किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे. चांगल्या रस्त्याअभावी नागरिक, वाहनधारक आदींची कुचंबणा होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. बहुतांशी मागास वर्गातील लोकसंख्या व त्यांच्या समस्या लक्षात घेऊन तालुक्याचे आमदार राजेश पाटील, खासदार संजय मंडलिक व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अग्रक्रमाने हा रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करावा अशी मागणी होत आहे. अशीच मागणी शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या कल्याणपूर ग्रामस्थांनी कोवाड बेळगाव रस्त्यावरील फाटा ते गावापर्यंतच्या एक किलोमीटर  दुरावस्थेतील रस्त्याबाबत केली आहे.


No comments:

Post a Comment